प्रख्यात कवी प्रशांत मोरे, भरत दौंडकर, नारायण पुरी, गुंजन पाटील, अरुण पवार यांचा सहभाग

 ना.पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत रंगणार निमंत्रितांचे कविसंमेलन


मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रा. पवन मुंडे, प्रितेश तोतला, अ‍ॅड. प्रणव मराठे, अनिश अग्रवाल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) परळीत राज्यातील प्रसिद्ध निमंत्रित कवींचे भव्य काव्य संमेलन रंगणार आहे. या मध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी प्रशांत मोरे (मुंबई), भरत दौंडकर (पुणे), नारायण पुरी (संभाजीनगर), गुंजन पाटील (जळगाव), अरुण पवार (परळी वैजनाथ) यांचे बहारदार आणि विविध विषयांवर शब्दांची बरसात होणार असुन या काव्य मैफलीस रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक परळी नागरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा भाजपा गटनेते प्रा. पवन मुंडे, भाजपाचे शहर सरचिटणीस प्रितेश तोतला, कोषाध्यक्ष अनिश अग्रवाल, नगरसेवक अ‍ॅड. प्रणव मराठे यांनी केले आहे.

    कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसते, ती समाजमनाचा स्पंदनशील आवाज असते. संवेदना, विचार आणि जीवनानुभव यांचा सुरेल आविष्कार घडविणाऱ्या अशाच एका काव्यमय सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी परळीकरांना ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि.१ ऑगस्ट रोजी सांयकाळी 5 लाभणार आहे. हा शब्दांचा सोहळा अक्षता मंगल कार्यालय, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या काव्यमैफलीत महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कवी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत रसिकांसमोर काव्यसुमने उधळणार आहेत. 

      यात बहारदार गेय कवितांच्या स्वराने रसिकांना भावविश्वाच्या नव्या क्षितिजावर घेऊन जाणारे प्रशांत मोरे (मुंबई) आपल्या अनुभवसंपन्न, अस्सल आणि जीवनगंधी कवितांबरोबरच प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाला वेगळी उंची प्रदान करणारे भरत दौंडकर (पुणे), आशयगर्भ आणि गेय कवितांमधून सामाजिक जाणिवांचा सशक्त आविष्कार करणारे नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर), तरुणाईच्या भावविश्वाला साद घालणाऱ्यापण सामाजिक आशयाने समृद्ध अशा कविता घेऊन नव्या पिढीशी संवाद साधणाऱ्या गुंजन पाटील (चाळीसगाव) तर आपल्या कवितांतून सामाजिक वास्तव,मानवी मूल्ये आणि माणुसकीचा ध्यास प्रभावीपणे व्यक्त करणारे प्राचार्य अरुण पवार (परळी वैजनाथ) हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत.

      काव्य, विचार आणि संस्कृतीचा हा उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजमनाला नवी दिशा देणारा ठरेल  असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या निमंत्रिताच्या कविसंमेलनास साहित्यप्रेमी, काव्यरसिक आणि सांस्कृतिक चळवळीशी नाते जपणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शब्दोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक परळीचे बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे, नगरसेवक अ‍ॅड. प्रणव मराठे, भाजपाचे शहर सरचिटणीस प्रितेश तोतला, कोषाध्यक्ष अनिश अग्रवाल यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...