श्रीगुरु सारिखा असता पाठिराखा......इतरांचा. लेखा कोण करी||

दृढ श्रद्धा : मुसळधार पावसाला न जुमानता येवती (लघु आळंदी) येथे गुरुभक्तांचा महासागर

मुखेड | अमोल जोशी

    गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त नांदेड जिल्ह्यातील येवती (लघु आळंदी) येथील श्री परमपूज्य सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थानात गुरुवारी भक्तिभावाचे अद्वितीय दर्शन घडले. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासह विविध भागांतून हजारो भाविकांनी मठात उपस्थित राहून श्री सद्गुरू नराशाम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत कृपाशीर्वाद प्राप्त केला.

पावसाची तमा न बाळगता दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर "जय गुरुदेव"च्या जयघोषाने आणि नामस्मरणाने दुमदुमून गेला होता. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर गुरुदर्शनाचा आनंद आणि अंतःकरणात भक्तीभावाचे दर्शन घडत होते. दिवसभर धार्मिक विधी, प्रार्थना, नामस्मरण आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रम श्रद्धापूर्वक पार पडले.

यावेळी मठ संस्थानाच्या वतीने हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. श्री. पांडुरंग यन्नावार (देगलूर) आणि श्री. भास्कर पाटील (शिरूर) यांच्या सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मठातील सेवेकऱ्यांनी शिस्तबद्ध नियोजन आणि निस्वार्थ सेवाभावातून प्रत्येक भाविकापर्यंत महाप्रसाद पोहोचविला.

गुरुपौर्णिमेचा हा सोहळा श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा संदेश देणारा ठरला. श्री सद्गुरू नराशाम महाराजांची कृपादृष्टी सर्व भक्तांवर अखंड राहो तसेच प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान, भक्ती, सदाचार आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा मिळो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार