धनंजय देशमुख व खिंडकर यांच्यातील कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या; बीड पोलिसांचा तपास पूर्ण, होणार कायदेशीर कारवाई बीड: पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा सर्रास गैरवापर करणाऱ्यांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबु...