मोठा झटका :अनेक वर्षांची ओळख पुसली; परळीतील 'बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय' अखेर परभणीला स्थलांतरित
१ जूनपासून नवीन मुख्यालयातून कामकाज होणार सुरू
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
गेल्या अनेक वर्षांपासून परळी वैजनाथ येथे कार्यरत असलेले 'अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ' हे महत्त्वाचे कार्यालय अखेर परभणी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतराबाबतच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या यापूर्वी सातत्याने प्रकाशित झाल्या होत्या. मात्र, अखेर परळीकरांना या महत्त्वाच्या कार्यालयाला मुकावे लागले आहे,
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मंडळांच्या आणि विभागीय कार्यालयांच्या मुख्यालयांमध्ये प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, १ जून २०२६ पासून नवीन ठिकाणाहून कामकाज सुरू होणार आहे. परळी वैजनाथ येथील 'अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ' हे कार्यालय या भागातील सिंचन आणि पाटबंधारे प्रकल्पांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते. हे कार्यालय येथून हलवले जाणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते आणि त्याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाजही उठवला होता. परंतु, याबाबत शासनाने दाखवलेली अनास्था आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे अखेर हे कार्यालय परभणी येथे हलवण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.
प्रशासकीय सुसूत्रता आणि 'एक मंडळ, एक जिल्हा' या धोरणानुसार इतरही अनेक कार्यालयांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत: मुख्य अभियंता (जसे), जलसंपदा विभाग, छ. संभाजीनगर: नवीन मुख्यालय - नांदेड , अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ: नवीन मुख्यालय - परभणी, अधीक्षक अभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड: नवीन मुख्यालय - हिंगोली, कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर: नवीन मुख्यालय - लोणी, अहिल्यानगर, कार्यकारी अभियंता, धाराशिव लघु पाटबंधारे विभाग, धाराशिव: नवीन मुख्यालय - छ. संभाजीनगर (नदीजोड प्रकल्पासाठी), कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प (भू.ज.) विभाग, नांदेड: नवीन मुख्यालय - लोणी, अहिल्यानगर (नदीजोड प्रकल्पासाठी), उपविभागीय अभियंता, पूर्णा आधुनिकीकरण उपविभाग, हट्टा कॅम्प: नवीन मुख्यालय - नाशिक (नदीजोड प्रकल्पासाठी) असा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान ,कार्यकारी संचालक (गो.म.पा.वि.म., छ. संभाजीनगर) यांनी दिलेल्या आदेशानुसार, सर्व संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांनी ०१ जून २०२६ या नवीन सिंचन वर्ष सुरू होण्याच्या तारखेपासून आपले कामकाज नवीन निश्चित केलेल्या मुख्यालयातून सुरू करायचे आहे. कार्यालयाच्या स्थलांतराबाबतचा आवश्यक तो पूर्तता अहवाल तात्काळ महामंडळ कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा