आळंदीत ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा 12 ऑगस्टला; ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांचा होणार सन्मान

आळंदी देवाची | प्रतिनिधी

गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था, घुंडरे गल्ली, आळंदी देवाची येथे मंगळवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी आध्यात्मिक वातावरणात ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा आणि कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, यंदाचा आध्यात्मिक आघाडीचा ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ह.भ.प. बालासाहेब मोहिते पाटील यांची कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. वारकरी परंपरेचा गौरव वाढविणाऱ्या आणि ज्ञानेश्वरीच्या अध्ययन-प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुरस्काराचे वितरण ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदीचे विश्वस्त, ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख बब्रुवाहन शेंडगे पाटील, प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब फपाळ पाटील, मराठवाडा अध्यक्ष रामभाऊ मोहिते पाटील, बीड जिल्हाध्यक्ष ह.भ.प. शिवराम सोंडगे तसेच उपस्थित संत-महंत आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, ह.भ.प. प्रमोद महाराज काळे, सारंगधर महाराज क्षीरसागर, ह.भ.प. अंगद महाराज शिर्के, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे आळंदी शहराध्यक्ष ह.भ. प. शंकर महाराज फपाळ आणि अनेक कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संस्थेचे आजी-माजी विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने योगदान देत आहेत.

गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेतून वारकरी परंपरा, संत साहित्य आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून, हा पुरस्कार सोहळा त्या परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे.

यावेळी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे पाटील, नंदकुमार कुराडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आध्यात्मिक परंपरेचा गौरव, संत साहित्याचा प्रसार आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला चालना देणारा हा सोहळा आळंदीतील धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी विशेष पर्वणी ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार