पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन
श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सर्वतोपरी सहकार्य करणार !
पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन
परळी वैजनाथ, दि.५-
आदर्श नागरिक घडण्यासाठी व मानवाच्या सर्वांगीण विकासाकरिता गुरुकुल ही शिक्षण प्रणाली ही अत्यंत पूरक असून याच्या माध्यमाने संस्कारक्षम पिढी घडते. या अनुषंगाने श्रद्धानंद गुरुकुल आश्रम संस्था मोलाचे कार्य करीत असून या परोपकारी संस्थेला भरीव निधी देऊन सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले.
येथील आर्य समाजाच्या वतीने नंदागौळ मार्गावर चालवल्या जाणाऱ्या श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास ना. पंकजाताई नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते. तर व्यासपीठावर स्वामी सोमानंद, स्वामी विद्यानंद, डॉ. ब्रह्ममुनिजी(काळे सर), आर्यमुनिजी, आचार्य सत्येंद्रजी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी गुरुकुलात चालवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या- एक उत्तम नागरिक घडण्यासाठी वेद, उपनिषद व प्राचीन ग्रंथातील ज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. या दृष्टीने गुरुकुल प्रयत्नशील आहे. इथे शिकणाऱ्या लहान ब्रह्मचाऱ्यांच्या शिक्षणासाठी व निसर्गोपचार चिकित्सा केंद्रासाठी शासनाकडून व व्यक्तिगतरीत्या निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्या म्हणाल्या. अध्यक्षीय समारोपात श्री जुगलकिशोर लोहिया यांनी गुरुकुलात चालणाऱ्या सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सर्वश्री डॉ. वीरेंद्र शास्त्री,जयपाल लाहोटी, डॉ. मधुसूदन काळे, आचार्य सत्येंद्रजी, डॉ.वीरश्री आर्य, यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले,तर सूत्रसंचालन श्री लक्ष्मणराव हुलगुंडे गुरुजी यांनी केले. शेवटी प्रशांतकुमार शास्त्री यांनी आभार मानले.
प्रारंभी यज्ञशाळेत ना. पंकजाताई मुंडे यांनी होमहवनात भाग घेत श्रद्धेने आहुत्या दिल्या. नंतर गुरुकुलातील चिकित्सालय, व्यायामशाळा, गोशाळा इत्यादी उपक्रमांना भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमास प्रा.डा. अरुण चव्हाण, गोवर्धन चाटे, पाटलोबा मुंडे, रंगनाथ तिवार, ओमप्रकाश भंडारी, योगिराज भारती, वसंत मुंडे, रामकिशन केकान, रवींद्र राठौर, दिलीप दीक्षित, लिंबाजी कदम, दिगंबर फड आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा