संस्कार शिबिरांमुळे मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य !- उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर परळी वैजनाथ, दि. २- आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे सर्वत्र चिंतेचे व अशांततेचे साम्राज्य पसरले असतानाच संस्कार शिबिरासारख्या प्रेरक उपक्रमांमुळे जगात प्रेम, सदाचार, दया, करुणा, सच्चारित्र्य, माणुसकी, सहिष्णुता आदी मानवी मूल्यांची जोपासना होऊन शांतता व सुख समृद्धी नांदू शकते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर यांनी केले. परळी येथून जवळच असलेल्या नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या "मानवता संस्कार व आर्य वीर दल प्रशिक्षण" शिबिराचा काल विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री लाटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया हे होते.यावेळी श्री हरिसिंह आर्य (दिल्ली), निवृत्त नायब तहसीलदार श्री बाबुराव रुपनर, उग्रसेन राठौर, रंगनाथ तिवार , प्रशांतकुमार शास्त्री, डॉ. मधुसूदन काळे, आचार्य सत्येंद्र...