आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद
मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे.
या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच या सेवा पूर्ववत केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
जोपर्यंत ही तांत्रिक अडचण दूर होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी संयम ठेवावा आणि सेवा केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा