स्व. अजितदादांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!
परळीचे औष्णिक वीज केंद्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर : संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश !
औष्णिक विद्युत केंद्राची प्रदूषण हलगर्जी, कायद्याचे उल्लंघन, नियमांची पायमल्ली आणि अनियमितता तपासणीत उघड
परळी वैजनाथ | प्रतिनिधी......
प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने कायमच वादग्रस्त ठरलेल्या परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या सुरू असलेल्या संच क्रमांक सहा, सात व आठ या संचापैकी संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद करा अशा पद्धतीची आदेशाची नोटीस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढली आहे. या नोटिसीतून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषण विषयक हलगर्जी, पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन, नियमांची सातत्याने पायमल्ली आणि अनियमितता अशा अनेक बाबी उघड झाल्या आहेत. या अनुषंगाने महानिर्मितीच्या अखत्यारीतील औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर परळीचे औष्णिक विद्युत केंद्र आल्याचे दिसून येत आहे.
परळी वैजनाथ येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) परळी औष्णिक वीज केंद्रावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) मोठी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानेसार संच क्रमांक 6 आणि 8 तात्काळ बंद करण्याचे आदेश आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत परळी औष्णिक वीज केंद्राकडून हवा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत सातत्याने गंभीर उल्लंघने होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, संच क्रमांक ६,७ आणि८ हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पूर्वीच्या बंद आदेशानंतरही कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.
धोकादायक काळ्या पाण्याचा थेट नाल्यात विसर्ग.....
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीदरम्यान काळ्या रंगाचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी केंद्राच्या हद्दीबाहेर नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे, तसेच राख तलावाचे ओव्हरफ्लो पाणी थेट बाहेर वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. कच्च्या सांडपाणी पंप हाऊसमधून सतत गळती होत असून परिसरातील शेती व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
ऑनलाईन सातत्यपूर्ण उत्सर्जन व सांडपाणी निरीक्षण प्रणाली बंद, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अपयशी...
डिसेंबर २०२४ पासून सांडपाण्याचा, तर सप्टेंबर २०२४ पासून वायुप्रदूषणाचा ऑनलाईन सातत्यपूर्ण उत्सर्जन व सांडपाणी निरीक्षण प्रणाली डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हरवर पाठवण्यात आलेला नाही.वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( CSIR-NEERI) च्या अहवालानुसार केंद्रातील विद्युतस्थैतिक धूळ संकलक यंत्रणा (ESP) प्रणाली धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी अपुरी ठरली आहे. तपासणीत धूळ उत्सर्जन ८७ ते ९१ mg/Nm³ आढळले, जे निर्धारित ५० mg/Nm³ मर्यादेपेक्षा जास्त आहे.
राख वापरात मोठी तफावत, दंड आकारला जाणार.....
राख वापराबाबत केंद्राने दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष राख वापर फक्त ५५.६१% असल्याचे ऑडिट अहवालातून स्पष्ट झाले असून किमान ८०% लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे प्रति टन १००० रुपये पर्यावरणीय नुकसानभरपाई आकारली जाण्याची शक्यता आहे.
धोकादायक कचऱ्याचे गैरव्यवस्थापन
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पा मधील गाळ राख स्लरीमध्ये मिसळून राख तलावात टाकण्यात येत असल्याचे, तसेच वापरलेले तेल शेकडो ड्रममध्ये जमिनीवर उघड्यावर साठवले असल्याचे आढळले. अनेक ठिकाणी तेल गळती होऊन माती प्रदूषित झाली आहे. राख बंधाऱ्यांचे २०१९ नंतर वार्षिक सुरक्षा ऑडिटही झालेले नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळला तातडीच्या कारवाईचे आदेश
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला युनिट ६ व ८ तात्काळ बंद ठेवणे, सर्व कोणतीही परवानग्या रद्द करणे, सर्व प्रकरच्या उल्लंघनांवर कठोर कारवाई करणे याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशांवर केलेल्या कारवाईचा अहवाल ३० दिवसांत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अद्याप आम्हाला अशा प्रकारचे आदेश किंवा नोटीस प्राप्त झाली नाही....
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन परळी औष्णिक विद्युत केंद्राने केलेले आहे. अनेक वेळा तपासण्यांमध्ये देण्यात आलेले निर्देशही पाळण्याचा काटेकोर प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संच क्रमांक सहा व आठ तातडीने बंद करण्याबाबत ची कोणतीही नोटीस अद्याप तरी आम्हाला प्राप्त झालेली नाही त्यामुळे याबाबत अधिक प्रतिक्रिया आम्ही व्यक्त करू शकणार नाहीत.
- सुनील इंगळे
मुख्य महाव्यवस्थापक, औष्णिक विद्युत केंद्र, परळी वैजनाथ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा