सोमेश्वर पालखी सोहळा उत्साहात....

दिंड्या व पालख्यांनी भजनाचा गजर करत प्रभू वैद्यनाथाचे महाशिवरात्रीला दर्शन 




परळी |

महाशिवरात्रीनिमित्त परळी नगरीत भक्तिमय वातावरणात विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्री संत जगमित्र नागा महाराज पालखी, श्री सोपान काका महाराज दिंडी, जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर संस्थानची पालखी तसेच मोतीराम महाराजांची पालखी वाजत-गाजत परळीत दाखल झाली. या पालखी सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

“प्रभू वैद्यनाथ भगवान की जय”, “श्री संत जगमित्र नागा महाराज की जय”, “श्री सोपान काका महाराज की जय” अशा जयघोषांनी पालखी मार्ग परिसर दुमदुमून गेला होता.

शहरापासून जवळ असलेल्या जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर संस्थान मंदिरातून रविवारी सकाळी सात वाजता श्री सोमेश्वरांची पालखी मोठ्या उत्साहात निघाली. दुपारी एक वाजता ही पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. त्यानंतर शिवाजी चौक, स्टेशन रोड, राणी लक्ष्मीबाई टॉवर, श्री संत जगमित्र नागा मंदिर मार्गे दुपारी साडेतीनच्या सुमारास पालखी वैद्यनाथ मंदिरात दाखल झाली. या पालखी सोहळ्यात सुमारे २५ हजार भाविक सहभागी झाले होते. पालखीच्या अग्रभागी कलशधारी महिला, घोडेस्वार, वाजंत्री, वीणेकरी, टाळकरी आणि मृदंगाचार्य यांचा सहभाग आकर्षण ठरला.

दरम्यान, श्री सोपान काका महाराजांची दिंडीही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत आली होती. तसेच श्री संत जगमित्र नागा मंदिर येथून निघालेली श्री जगमित्र महाराजांची पालखी वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन मेरू प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात परतली.

झोला येथून निघालेली मोतीराम महाराजांची पालखीही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत दाखल झाली. या पालखीत ह.भ.प. प्रभाकर महाराज यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले होते.महाशिवरात्रीनिमित्त निघालेल्या या विविध पालख्या व दिंड्यांमुळे परळी नगरीत भक्तिरसाचा सागर उसळला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार