तरुणी कडून झालेला अपमान सहन न झाल्याने जीवन संपवले...
"हा माझा शेवटचा फोन आहे" असे वडिलांना म्हणत युवकाची गळफास लावून आत्महत्या
परळी वैजनाथ: प्रतिनिधी....
"हा माझा शेवटचा फोन आहे" वडिलांना असे म्हणत युवकाची गळफास लावून आत्महत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील मोहा येथे ही घटना घडली. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेल्या तीव्र अपमानामुळे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या जाहीर अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता. हा मानसिक छळ सहन न झाल्याने त्याने १४ मे रोजी सायंकाळी आपल्या वडिलांना फोन केला आणि 'हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही' असे सांगून फोन बंद केला.
त्यानंतर चंद्रहारने मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे जाऊन लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संबंधित तरुणीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफळे पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा