क्रीडाविषयक प्रोत्साहन.....

 अंबाजोगाई क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोहम गजाकोशचा दबदबा





डॉ.अतुल शिंदे यांच्या हस्ते सोहमला आरसीबी खेळाडू देवदत्त पड्डिक्कल यांच्या सहीचा बॉल प्रदान

अंबाजोगाई : (प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये युवा गोलंदाज सोहम गजाकोश याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत विशेष छाप पाडली. स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सोहमने तब्बल 13 फलंदाजांना बाद केले आणि “बेस्ट बॉलर” किताबावर आपले नाव कोरले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींनी त्याचे जोरदार कौतुक केले.

संपूर्ण स्पर्धेत सोहमने टाकलेल्या माऱ्यासमोर अनेक फलंदाज निष्प्रभ ठरले. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन-लेंथ आणि दबावाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो स्पर्धेतील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

या स्पर्धेसाठी “बेस्ट बॉलर” पारितोषिक देण्याची घोषणा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. अतुल शिंदे यांनी केली होती. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात नगरसेवक गणेश देशमुख, नगरसेवक किरण भालेकर, रोटरी अंबाजोगाई सिटी अध्यक्षा रोहिणी ताई पाठक, भगवान बरकते, सचिन वाघमारे, हरीश रुपडा तसेच पत्रकार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहम गजाकोश याला “बेस्ट बॉलर” किताब प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गौरव होताच मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी स्पर्धेत आणखी एक खास आकर्षण पाहायला मिळाले. सोहमला देण्यात आलेल्या बॉलवर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणारा युवा स्टार खेळाडू Devdutt Padikkal यांची स्वाक्षरी घेण्यात आली. क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण अत्यंत खास ठरला.

आज डॉ. अतुल शिंदे यांच्या हस्ते हा विशेष स्वाक्षरीयुक्त बॉल सोहम गजाकोश याला प्रदान करण्यात आला. हा बॉल स्वीकारताना सोहमच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. युवा क्रिकेटपटूसाठी ही एक अविस्मरणीय भेट ठरली असून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी हा क्षण प्रेरणादायी मानला जात आहे.

अंबाजोगाई परिसरात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे अनेक युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार