संतापजनक घटना
परळीत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज खंडित; जनता त्रस्त, महादेव गंगणे पाटील यांचा तीव्र संताप
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरात महावितरणच्या (MSEDCL) अत्यंत ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून महावितरण प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय दिवसातून अनेक वेळा तासनतास अघोषित वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांत वीज गुल होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वारंवार वीज जात असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे धंदे कोलमडले असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अनेक भागांत उघड्या डीपी (DP) आणि लोंबकळणाऱ्या वीज तारा दुरुस्त करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.
महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात बोलताना शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील म्हणाले की, नागरिक जेव्हा तक्रारी घेऊन महावितरण कार्यालयात जातात, तेव्हा जबाबदार अधिकारी जागेवर उपलब्ध नसतात. फोन केले तरी त्यांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत. "महावितरणने आपला भोंगळ कारभार त्वरित सुधारावा आणि परळीतील वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल" असेही महादेव गंगणे म्हणाले.
परळीतील विस्कळीत वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता शहरवासीयांकडून जोर धरू लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा