कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे
"मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.
दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ठेवला होता. मात्र, त्याच दिवशी बाबांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि सर्वकाही बदलून गेले," असे त्या म्हणाल्या.
"आज या घटनेला बारा वर्षे झाली असली तरी ती घटना आजही तितकीच ताजी आहे. अनेकदा असे वाटते की हे सर्व एखादे वाईट स्वप्न होते. दरवर्षी ३ जून जवळ आली की मन अस्वस्थ होते. विनाकारण चिडचिड होते, अस्वस्थता जाणवते. शरीराची एक स्मृती असते आणि त्या दुःखाची जाणीव पुन्हा ताजी होते," असे सांगताना त्या भावूक झाल्या.
"बाबा माझे सुपरहिरो होते"
वडिलांविषयी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, "बाबा माझ्यासाठी केवळ वडील नव्हते, तर ते माझे सुपरहिरो होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. आजही माझ्या बोलण्याच्या पद्धतीत, शरीरभाषेत लोकांना त्यांची झलक दिसते. अनेकदा माझ्याच एखाद्या कृतीत मला बाबांची आठवण येते."
त्या पुढे म्हणाल्या, "माझे कौतुक व्हायला हवे असे प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा बाबांची खूप आठवण येते. कारण माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा, माझ्या यशात आनंद मानणारा माणूस आता माझ्यासोबत नाही."
"अत्यंत व्यस्त असूनही कुटुंबासाठी वेळ द्यायचे"
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगताना पंकजा ताई मुंडे म्हणाल्या की, "बाबा अत्यंत व्यस्त असायचे. पक्ष संघटना उभारण्यापासून ते विरोधी पक्षनेते आणि नंतर गृहमंत्री म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. मात्र, एवढ्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी कुटुंबासाठी वेळ काढणे कधी सोडले नाही." "आमचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, सण-उत्सव ते कधीच विसरत नसत. रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहायचे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी त्यांचे घट्ट भावनिक नाते होते," असे त्यांनी सांगितले.
"नैसर्गिक राहण्याची बाबांची शिकवण"
राजकारणातील आपल्या प्रवासावर बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, बाबांनी त्यांना सर्वात महत्त्वाची शिकवण दिली ती म्हणजे नैसर्गिक राहण्याची."राजकारणात आल्यानंतर अनेकदा प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र बाबा नेहमी म्हणायचे की, जशी आहेस तशीच राहा. लोकांशी प्रामाणिक आणि नैसर्गिक राहिल्यास त्यांच्याशी सहज नाते निर्माण होते. आज लोकांशी माझे असलेले नाते हे बाबांच्या या शिकवणीमुळेच आहे," असे त्यांनी सांगितले.
"मंत्रीपद म्हणजे केवळ लोकसेवेचे माध्यम"
२०१४ मध्ये मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरची भावना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, "माझे मंत्री होणे ही केवळ राजकीय घटना नव्हती, तर लोकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यावर दाखवलेला विश्वास होता. मंत्रिपद ही सत्ता नसून लोकांची कामे करण्याचे माध्यम आहे. माझ्या शपथविधीवेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट हा माझ्यासाठी नव्हता, तर गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याला दिलेला सन्मान होता."
"बाबा असते तर कदाचित मी राजकारणात नसते"
मुलाखतीच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी एक भावनिक विधान केले. त्या म्हणाल्या, "बाबा आज असते तर कदाचित मी सक्रिय राजकारणात नसते. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच मी त्यांना पुढील निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले होते. मला वेगळ्या क्षेत्रात काम करायचे होते. मात्र नियतीने वेगळेच ठरवले आणि मी राजकारणात कायमची आले."
पंकजाताई मुंडे यांच्या या मुलाखतीतून स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्याविषयी असलेले त्यांचे अपार प्रेम, राजकारणातील संघर्ष आणि वडिलांकडून मिळालेले संस्कार अधोरेखित झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा