बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीने चैतन्य....
माजलगावात भाजपाची भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले शहर
माजलगाव (प्रतिनिधी) : बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य-दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक सहभागी झाले होते. रॅलीतील तिरंग्यांची आकर्षक सजावट आणि देशभक्तीचा उत्साह लक्षवेधी ठरला.
डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली माजलगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भव्य स्वरूपात पार पडली.
रॅलीच्या माध्यमातून ‘तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे’, हा संदेश देण्यात आला. संपूर्ण रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानातंर्गत माजलगाव येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष्य वेधून घेतले होते. भाजप नेते माधवराव निर्मळ, ज्ञानेश्वर मेंडके, अरुण राऊत, संजय आंधळे, बालासाहेब चोले, रूपाली कचरे, अभिजित सोळंके, विनायक रत्नपारखी, सुखदेव रेडे, लालासाहेब तिडके, अभय होके, अशोक तिडके, नितीन नाईकनवरे, दीपक मेंडके, शिवाजी काळे, बाळासाहेब गायकवाड, राजू कोमटवार, बाबा मुंडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.माजलगाव शहरातील झेंडा चौक येथून या रॅलीस सुरुवात झाली तर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी तरुणाईने योगदान द्यावे: डॉ. प्रितम मुंडे
तिरंगा रॅलीच्या समारोप प्रसंगी उपस्थित नागरिक आणि सहभागी कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉ. प्रितम मुंडे यांनी सशक्त भारताच्या निर्मितीसाठी तरुणांनी योगदान देण्याचे आवाहन केले. राष्ट्रकार्यात निःसंकोच सहभाग नोंदवून आपल्या देशाचा आणि आपल्या बांधवांचा विकास साधण्यात सहभागी व्हा. माजलगावच्या तिरंगा रॅलीस उपस्थित राहण्याचे सौभाग्य मला ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेमुळे मिळाले, सर्वांचा सहभाग, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जाज्वल्य राष्ट्रभावनेने अतिशय आनंदी आहे. सर्वांना एकत्र आणणारा हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला देऊन संपूर्ण देशात राष्ट्रचेतना निर्माण केली असल्याचे त्या म्हणाल्या. तद्नंतर राष्ट्रगीत आणि राज्य गीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा