परळीतील आदर्श शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे दुःखद निधन
परळी वैजनाथ:( प्रतिनिधी)
परळी शहरातील बालाजी मंदिर येथिल रहिवासी आणि आदर्श निवृत्त शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे आज (दि. १४) सकाळी ११:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
गोविंदराव भातलंवडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर त्यांना परळी येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६:०० वाजता परळी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, त्यांचे जुने सहकारी आणि त्यांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
स्व. गोविंदराव भातलंवडे यांनी परळी तालुक्यात आपल्या अध्यापन कौशल्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता. तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांच्यावर उत्तम संस्कारही केले. आपल्या अष्टपैलू मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले,
. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, शिस्तप्रिय आणि मार्गदर्शक असा होता. निवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक घडामोडींमध्ये नेहमी सक्रिय असायचे. त्यांना परिसरामध्ये आदराने 'तात्या' म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने भातलंवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परळी शहराने एक मार्गदर्शक आणि जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक गमावला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा