मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...
तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालकांचे हक्क, संरक्षण, शिक्षण आणि न्याय याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण समारंभानंतर दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, परळी वै. येथून मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, तालुका विधी सेवा समिती, परळी वै., वकील संघ परळी वै., तालुका पोलीस प्रशासन तसेच इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीमध्ये विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बालकांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
बालमजुरी, बालविवाह रोखण्याबाबत जनजागृतीः वॉकेथॉनच्या माध्यमातून बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह निर्मूलन, बालकांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी, लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण, प्रत्येक बालकाला न्यायाचा अधिकार तसेच प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार या विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
बालक हे देशाचे भवितव्य असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. बालकांवर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. याच उद्देशाने वॉकेथॉनच्या माध्यमातून बालहक्कांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेः
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा मा.न्यायाधीश श्री डी. वाय. रायरीकर यांनी परळी वै. तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या वॉकेथॉन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून बालहक्कांबाबत जनजागृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमाकरीता वकिल संघ परळी वै. चे सर्व विधीज्ञांनी व नागरीक तसेच विद्यार्थ्यांना कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सक्रीय सहभागी व्हावे असे अहवान अध्यक्ष श्री. अॅड. डी. पी. कडभाने यांनी केले आहे.या विषयांवर होणार जनजागृती (मुद्दे):
बालमजुरी प्रतिबंध
बालविवाह निर्मूलन
बालकांचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी
लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण
प्रत्येक बालकाला न्यायाचा अधिकार
प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार
आवाहनःस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या वॉकेथॉनमधून बालकांच्या हक्काबाबत जनजागृती करण्यासोबतच कायदेविषयक जागरूकता निर्माण होणार आहे. परळी वै. शहर व तालुक्यातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा