श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड; मच्छिंद्रनाथ देवस्थानाला २.५१ लाखांची चांदी अर्पण 



कडा : प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या विकासासाठी भाविक, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्याचा ओघ वाढला आहे. आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा युवा उद्योजक अशोक चौधरी यांनी देवस्थानासाठी एक किलो चांदीची वस्तूरूप देणगी दिली. सुमारे २ लाख ५१ हजार रुपये किमतीची ही देणगी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली.

श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हे आष्टी तालुक्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानाच्या विकासासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू असून, आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीसह विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. या विकासकामांना हातभार लागावा, या उद्देशाने अशोक चौधरी यांनी रोख रकमेऐवजी चांदीच्या स्वरूपात देणगी देत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

चौधरी यांनी दिलेली १ हजार ग्रॅम म्हणजेच एक किलो चांदी देवस्थानाच्या नावे वस्तूरूपात स्वीकारण्यात आली. या देणगीची अंदाजे किंमत २ लाख ५१ हजार रुपये असल्याची नोंद देवस्थानाच्या अधिकृत पावतीवर करण्यात आली आहे. देवस्थानाच्या विकासासाठी वस्तूरूप देणगी देण्याचा हा पुढाकार इतर भाविकांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

आमदार सुरेश धस यांनी अशोक चौधरी यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालत देवस्थानाच्या विकासासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, देवस्थानाच्या पावतीवर नमूद केल्याप्रमाणे देवस्थानाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी रोख अथवा वस्तूरूप देणगी स्वीकारली जात नाही. त्यामुळे भाविकांनी देणगी देताना अधिकृत माध्यमाचा वापर करून पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी युवा नेते जयदत्त धस, माऊली जरांगे, महेंद्र गर्जे, ज्ञानेश्वर चौधरी, सचिन चौधरी, सुरेश सोनवणे, अध्यक्ष दादासाहेब चितळे, सरपंच राजेंद्र मस्के, सचिव बाबासाहेब मस्के, अमोल शिंदे यांच्यासह मित्रपरिवार व भाविक उपस्थित होते.

भाविकांनी विकासासाठी पुढे यावे

“श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. मंदिराच्या विकासकामांना अधिक गती मिळण्यासाठी भाविक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने योगदान द्यावे. श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी जपत देवस्थानाच्या विकासात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा,” असे आवाहन अशोक चौधरी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार