दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शनाची मागणी...

 पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी परळी तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करा – डॉ. संतोष मुंडे

दिव्यांग जेष्ठ नागरिक यांना स्वतंत्र दर्शन रांग करा -डॉ. संतोष मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक परळी वैजनाथ येथे येत आहेत. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असल्याने स्थानिक भाविकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे परळी वैजनाथ तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी, अशी मागणी दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आ. धनंजय मुंडे, ना. पंकजाताई मुंडे, तहसीलदार व वैद्यनाथ मंदिर देवल कमिटी यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे दाखल होतात. त्या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे.

पौराणिक मान्यतेनुसार श्री वैद्यनाथ हे रोगहारी, दुःखनाशक आणि मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार, विविध सणांचे दिवस आणि महिनाभरातील अन्य धार्मिक पर्वांनिमित्त येथे भक्तांची विशेष गर्दी होत असते. भगवान शंकराला जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि रुद्राभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने परळी वैजनाथची वाट धरतात. यंदाही श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन श्री वैद्यनाथ देवस्थान समितीने मंदिर परिसरात व्यापक नियोजन सुरू केले आहे.

मात्र, मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने स्थानिक नागरिकांनाही दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. अनेक स्थानिक भाविक नियमितपणे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे तिरुपती, आळंदी, शिर्डी, पंढरपूर आदी देवस्थानांप्रमाणे परळी वैजनाथ येथेही तालुक्यातील स्थानिक भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन बारी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी आधारकार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना स्वतंत्र रांगेतून दर्शनाची सुविधा देता येईल. यामुळे स्थानिकांचा वेळ वाचण्यासोबतच मुख्य दर्शन रांगेवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच काही भाविक मागील दरवाजातून दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातून सुरक्षा रक्षक आणि भाविकांमध्ये शाब्दिक वाद किंवा धक्काबुक्कीचे प्रसंग घडतात. स्वतंत्र दर्शन रांग केल्यास अशा प्रकारांनाही आळा बसू शकतो.

दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शनाची मागणी

दिव्यांग बांधवांना मंदिरात सुलभ आणि सन्मानपूर्वक दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे. मंदिरात सुविधा दर्शविणारा फलक असला तरी तो दर्शनी भागात नसल्याने दिव्यांग भाविकांना सुविधांची माहिती मिळण्यात अडचण येते. त्यामुळे केवळ फलक न लावता प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष तहसीलदार तसेच देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी स्थानिक आणि दिव्यांग भाविकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा. श्रावणातील वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्व भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था तातडीने सुरू करावी, असे आवाहन डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार