दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ येथेप्रांतीय अधिवेशन...

इतिहास संकलन संस्था देवगिरी प्रांताचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर

परळीतील प्रांतीय अधिवेशनात होणार मान्यवरांचा गौरव

परळी वैजनाथ, प्रतिनिधी : इतिहास संशोधन, अध्यापन, शैक्षणिक कार्य आणि संघटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चार मान्यवरांना इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्र – देवगिरी प्रांताच्या वतीने यंदाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण दि. १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे आयोजित पाचव्या प्रांतीय अधिवेशनात करण्यात येणार आहे.

इतिहास संकलन संस्थेच्या परंपरेनुसार इतिहास क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारार्थींची निवड २७ जुलै रोजी झालेल्या देवगिरी प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत सखोल चर्चेनंतर एकमताने करण्यात आली.

यंदाचा 'बाबासाहेब आपटे ज्येष्ठ इतिहास संशोधक पुरस्कार' धाराशिव येथील प्रा. डॉ. सतीश कदम यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य इतिहास संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉ. कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तुळजाभवानी मंदिराचा इतिहास, पेशवेकालीन इतिहास, ऐतिहासिक स्थळे तसेच दुर्मीळ कागदपत्रांवर संशोधन केले आहे. 'गाळीव इतिहास' या युट्यूब माध्यमातून ते पुराव्याधिष्ठित इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.

'स्व. मोरोपंत पिंगळे शैक्षणिक कार्य पुरस्कार' जळगाव येथील डॉ. नरसिंह परदेशी (बघेल) यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न राहून त्यांनी इतिहास विषयाच्या अध्यापन व संशोधनात मोठे योगदान दिले आहे. राजपूत इतिहास, मेवाड आणि महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावरील त्यांचे संशोधनग्रंथ इतिहास क्षेत्रात मान्यताप्राप्त मानले जातात.

'स्व. हरिभाऊ वाकणकर शिक्षक पुरस्कार' वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील प्रा. डॉ. सच्चिदानंद बिच्चेवार यांना जाहीर झाला आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रचिंतन विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. बसवेश्वर, विदर्भाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास आणि भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षण या विषयांवरील त्यांच्या व्याख्यानांची राज्यभर दखल घेतली जाते.

तर 'स्व. डॉ. सतीश मित्तल संघटन पुरस्कार' जालना येथील श्री. रामभाऊ रुस्तुमराव लांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. होळकर घराण्याचा इतिहास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्याचा अभ्यास, संशोधन आणि जनजागृतीसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. इतिहास संकलनाच्या संघटनात्मक कार्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

इतिहास संकलन संस्था, महाराष्ट्र – देवगिरी प्रांताच्या या पुरस्कारांमुळे इतिहास संशोधन, अध्यापन, शैक्षणिक कार्य आणि संघटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळत असून भारतीय दृष्टिकोनातून इतिहास अभ्यासाला नवे बळ मिळत असल्याची भावना इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.

या पुरस्कारांची घोषणा पश्चिम क्षेत्रीय संघटन सचिव प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी, देवगिरी प्रांताध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. देवर्षी मुकुंद, कार्याध्यक्ष डॉ. व्यंकटेश लांब, सचिव प्रा. धनंजय जवळेकर, संघटन सचिव डॉ. रवी सातभाई आणि आयोजन सचिव डॉ. बाबासाहेब शेप यांनी संयुक्तपणे केली. त्यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन करत इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी १३ व १४ ऑगस्ट रोजी परळी वैजनाथ येथे होणाऱ्या पाचव्या प्रांतीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार