संतभूमी संरक्षणाच्या लढ्याला महाराष्ट्रव्यापी दिशा; पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ :
संतभूमीच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे दि. १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील निष्ठावंत वारकरी, संतप्रेमी, पर्यावरणवादी, इतिहास संशोधक व अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सन २००७ पासून सुरू असलेल्या संतभूमी संरक्षणाच्या आंदोलनाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला आता अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याचा निर्णय उपस्थितांच्या सर्वसंमतीने घेण्यात आला.
बैठकीत प्रामुख्याने पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले—
१) आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्ती वाढविणे.
संतभूमी, भंडारा-भामचंद्र आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय वारशाच्या संरक्षणाचा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
२) ‘भंडारा-भामचंद्र बचाव मुक्ती संघर्ष समिती’ची जिल्हा, तालुका व गावपातळीवर स्थापना करणे.
या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची संघटनात्मक बांधणी करून भंडारा-भामचंद्रच्या संरक्षणाचा विषय जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत उपस्थित वारकरी, संतप्रेमी, पर्यावरणवादी, इतिहास संशोधक आणि अभ्यासकांनी भंडारा-भामचंद्र ही केवळ एक भौगोलिक स्थळे नसून महाराष्ट्राच्या संतपरंपरेशी, इतिहासाशी आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेली महत्त्वपूर्ण भूमी असल्याचे मत व्यक्त केले.
सन २००७ पासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता नव्या टप्प्यावर घेऊन जात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संतभूमी संरक्षणाचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बैठकीच्या माध्यमातून उपस्थितांनी एकजुटीने पुढील काळातील आंदोलन अधिक व्यापक, शांततामय, लोकशाही मार्गाने आणि संघटित पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार केला.
“संतभूमीचे संरक्षण ही केवळ काही व्यक्तींची जबाबदारी नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची सामूहिक जबाबदारी आहे,” असा सूर बैठकीत व्यक्त झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा