आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...
डॉ. बळीराम पांडे : प्रबोधनाचा प्रेरणास्त्रोत
मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देवगिरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले आमचे जिवलग सन्मित्र, संघर्ष योद्धा, विचारवंत, साहित्यिक तथा प्रबोधनाचा प्रेरणास्त्रोत प्रा. डॉ. बळीराम पांडे यांचा २० मे हा जन्मदिन. या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख जीवनप्रवासाकडे पाहताना मन अभिमानाने भरून येते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. संकटे, अभाव, संघर्ष आणि जीवनातील असंख्य वादळांना सामोरे जात त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले. सामान्य परिस्थितीतून असामान्य उंची गाठणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. बळीराम पांडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आज ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, जीवाला जीव देणारे मित्र, एकनिष्ठ कार्यकर्ते, अभ्यासू विचारवंत आणि कुशल संघटक म्हणून सर्वपरिचित आहेत.
मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. परिवर्तनवादी विचारांचा ध्यास घेत त्यांनी आयुष्यभर समाजप्रबोधनाची मशाल प्रज्वलित ठेवली आहे. त्यांच्या पायाला जणू भिंगरीच लागलेली आहे; कारण विश्रांतीपेक्षा समाजकार्य त्यांना अधिक प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची गाथा शब्दबद्ध करणे हे खरोखरच कठीण कार्य आहे. मात्र असे प्रेरणादायी आयुष्य इतिहासाच्या पानांवर नोंदले गेलेच पाहिजे, असे मनापासून वाटते.
डॉ. पांडे यांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका नायकाची प्रेरणादायी कहाणी होय. अनेक संकटे, अडथळे, अवहेलना आणि कठीण प्रसंग आले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. चिकाटी, जिद्द आणि ध्येयवादी वृत्तीच्या बळावर ते आजही तितक्याच ताकदीने समाजकार्यात उभे आहेत. त्यांच्या जगण्याचा समग्र पट हा एका संघर्षशील योद्ध्याचा जीवनप्रवास अधोरेखित करतो.
शिक्षणक्षेत्र त्यांच्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. बालपणीचा “बळी” नावाचा एक सामान्य मुलगा ते प्रा. डॉ. बळीराम पांडे होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तर ज्ञानाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याच्या ध्येयाचा प्रवास आहे. ज्ञान हेच समाजाच्या मुक्तीचे प्रभावी साधन आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. शिक्षण हा न्यायी, समताधिष्ठित आणि प्रबुद्ध समाजाचा पाया आहे, ही त्यांची विचारधारा त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रकर्षाने दिसून येते.
बुद्ध, शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे ते प्रखर अभ्यासक आणि वाहक आहेत. ही परिवर्तनवादी विचारधारा जनमानसात पोहोचावी, समाजात समता, बंधुता आणि मानवता रुजावी यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील उपेक्षित, वंचित आणि तळागाळातील माणसांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक लढे उभे केले. संघर्ष या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजेच प्रा. डॉ. बळीराम पांडे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुमारे चार दशकांच्या संघर्षशील प्रवासात त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक लढ्यांचे नेतृत्व केले. तळागाळातील माणसांसाठी संघर्ष करताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याची पर्वा केली नाही. त्यांच्या या संघर्षाचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आम्ही एकत्र घडलो, वाढलो आणि विचारांच्या वाटेवर चालत राहिलो. अस्तित्वाची लढाई, सत्त्वपरीक्षा आणि अनेक संघर्षमय प्रसंगांमधून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक प्रगल्भ होत गेले.
आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांच्याशी असलेले त्यांचे ऋणानुबंध हे त्यांच्या आयुष्यातील एक सोनेरी पर्वच म्हणावे लागेल. त्या नात्यातील अनेक नाजूक, भावनिक आणि प्रेरणादायी धागे त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने जपले आहेत. माणुसकी, मैत्री आणि निष्ठा या मूल्यांचे ते जणू चालते-बोलते विद्यापीठ आहेत.
डॉ. बळीराम पांडे यांची संघर्षयात्रा ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही, तर ती अनेकांना प्रेरणा देणारी, संस्कार करणारी आणि समृद्ध करणारी जीवनगाथा आहे. त्यांचा जीवनप्रवास तरुण पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांनी केलेले कार्य, जपलेली मूल्ये आणि जोपासलेली विचारधारा ही समाजासाठी प्रेरणेची अखंड ऊर्जा आहे.
२० मे या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना उदंड आयुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अखंड कार्यशक्ती लाभो, हीच सदिच्छा! त्यांच्या लेखणीला, विचारांना आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला अधिकाधिक बळ लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
जन्मोत्सवाच्या आभाळभर शुभेच्छा..!
✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे
(9822846675)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा