एटीएम फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; २४ तासांत तिघांना अटक

अंबाजोगाई, प्रतिनिधी : शहरातील बस डेपोजवळील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत आरोपींना अंबाजोगाई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

३ जुलै रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बस डेपोजवळील एसबीआयचे एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच आरोपींनी रोकड न घेता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित वाहन परळीच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. परळी शहर पोलिसांच्या मदतीने वाहनावरील सांकेतिक चिन्हाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर आरोपी परभणी जिल्ह्याकडे गेल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, परभणी यांच्या सहकार्याने सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये परमेश्वर सोनाभाऊ बनगर (रा. झरी, ता. मानवत), राजेश भाऊसाहेब कांबळे (रा. कोल्हा, ता. मानवत) आणि विवेक बबन धारे (रा. कोल्हा, ता. मानवत, जि. परभणी) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले महिंद्रा मॅक्स वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे व त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड करीत असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...