पोलीस भरतीच्या  सरावावरून परतणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग


परळी वैजनाथ | प्रतिनिधी :

        पोलीस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या दोन महिलांचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना परळी शहरात घडली. महिलांनी घडलेल्या प्रकारानंतर पतीला बोलावून घेतले असता संबंधित तरुणांनी पतीलाही झटापट करुन पलायन केल्याची घटना घडली. दरम्यान, संशयितांनी आपली बजाज पल्सर दुचाकी (क्रमांक एमएच ४४ एएफ ५४४३) घटनास्थळी सोडून पलायन केले.याप्रकरणी एका ३० वर्षीय गृहिणीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिला व तीची मैत्रीण दोघींजणी या स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीच्या तयारीसाठी मागील काही महिन्यांपासून  दररोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत धावण्याचा सराव करतात. १८ ऑगस्ट रोजीही दोघी वैद्यनाथ महाविद्यालय परिसरात सरावासाठी गेल्या होत्या. सराव आटोपल्यानंतर रात्री सुमारे ७.४५ वाजता दोघी परळी- अंबाजोगाई रस्त्याने पायी घरी परतत असताना वैद्यनाथ महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर त्यांच्या मागून दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले.  त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या मैत्रीणीच्या कमरेवर हाताने मारले. त्यानंतर दोघांनी पुन्हा दुचाकी वळवून महिलांकडे येत गैरवर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलांनी पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित दुचाकीस्वार पुन्हा महिलांकडे आला. पुढे दोन्ही महिला आझाद चौक परिसरात पोहोचल्यानंतर त्यांचे पतीही तेथे आले. त्यानंतर  दोघी महिला पतीच्या मोटारसायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने गेल्या. संशयित दोघेही त्याच दिशेने गेले होते. संशयित आरोपी छत्रपती शिवाजी महाराज  चौकाजवळ थांबलेले दिसले. महिलांच्या पतीने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांच्याशी झटापट केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दोन्ही संशयित आपली बजाज पल्सर दुचाकी घटनास्थळी सोडून तेथून पळून गेले.या घटनेप्रकरणी  दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सोडून दिलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

-------------------

     परळी शहरात नियमित व्यायाम व धावण्याचा सराव करणाऱ्या महिलांशी घडलेल्या या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सकाळ- संध्याकाळ  बाहेर पडणाऱ्या महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार