अश्विन मोगरकर यांची मागणी...

 परळी नगरपरिषदेच्या सभांचे थेट प्रक्षेपण व पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरीची मागणी




परळी वैजनाथ : परळी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे आणि नागरिकांना नगरपरिषदेच्या निर्णयप्रक्रियेची माहिती थेट उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे परळी शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शहरातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या, विविध योजनांची अंमलबजावणी, आर्थिक विषयांसह अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे मोगरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वसाधारण सभांचे नियमित Live Streaming करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. यामुळे नागरिकांना आपल्या शहराशी संबंधित विषयांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये होणारी चर्चा थेट पाहता येईल तसेच नगरपरिषदेच्या कामकाजातील नागरिकांचा सहभागही वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरीचीही मागणी

यासोबतच नगरपरिषदेच्या सभागृहात पत्रकारांना सभेचे कामकाज व्यवस्थित पाहता आणि वृत्तांकन करता यावे, यासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी पत्रकार गॅलरी उभारण्यात यावी, अशीही मागणी मोगरकर यांनी केली आहे.

पत्रकारांना योग्य बैठक व्यवस्था, सभागृहातील चर्चेचे स्पष्ट दृश्य आणि वृत्तांकनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास सभेतील चर्चेचे अचूक व वस्तुनिष्ठ वृत्तांकन नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

बीड, अंबाजोगाईसह जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका व नगरपरिषदांकडून सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. त्याच धर्तीवर परळी नगरपरिषदेनेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सभांचे थेट प्रक्षेपण सुरू करावे, अशी अपेक्षा मोगरकर यांनी व्यक्त केली.

नगरपरिषदेने या दोन्ही मागण्यांची सकारात्मक दखल घेऊन सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी या बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार