‘पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, स्मशानभूमी ठेवून जात आहोत’
परळी वैजनाथ : प्रतिनिधी..
मातीची धूप, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर आणि जलप्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, तर स्मशानभूमी ठेवून जात आहोत, अशी परखड भूमिका प्रमुख व्याख्याते दीपक पवार यांनी मांडली.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच मृद व जलसंधारण दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख होते, तर प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेकानंद कवडे यांनी मृद व जलसंधारणाच्या क्षेत्रात सुधाकरराव नाईक यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना दीपक पवार म्हणाले की, जमिनीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अतिप्रमाणात वापर केल्याने जमिनीची सुपीकता धोक्यात आली आहे. पावसाच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असून, भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन टिकवायची असेल तर मृदसंधारणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी मोठे बांध घालणे, पिकांची पेरणी जलप्रवाहाच्या आडव्या दिशेने करणे, मातीची धूप रोखणे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी नद्यांमधून वाहणारे पाणी पिण्यायोग्य होते; मात्र वाढत्या प्रदूषणामुळे आज पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीत मुरणारे पाणीही रसायनयुक्त होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे पवार यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. प्रसाद देशमुख यांनी मृद व जलसंधारणाच्या क्षेत्रातील स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाची आठवण करून दिली. मातीचा अवघा एक इंच थर तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात; मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत ही मौल्यवान माती काही क्षणांत वाहून जाते. त्यामुळे माती आणि पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. व्ही. कचरे यांनी केले, तर आभार डॉ. व्ही. डी. गुळभिले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा