पालकांनी मुलांच्या शिक्षणावर जागता पहारा ठेवावा..!



दिशाहीन होण्यापासून मुलांना वाचवणे ही पालकांचीही जबाबदारी - राम कुलकर्णी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

    पालकांनी मुलांना महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे न समजता त्यांच्या शिक्षणाबरोबरच संगत, सवयी, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडेही जागरूकतेने लक्ष द्यावे. अकरावी - बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात मुलांना दिशाहीन होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालकांचीही आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित पालक मेळावा - २०२६ मध्ये मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.दीपक फुलारी होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, डॉ.बिभीषण फड, उपप्राचार्य आनंद पाठक, पर्यवेक्षक जिजाराम कावळे प्रा.प्रल्हाद तावरे आदींची उपस्थिती होती.    

          कार्यक्रमात राम कुलकर्णी यांनी पुढे बोलताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक आणि वेगाने बदलणाऱ्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. मुलगा असो वा मुलगी ते नियमित महाविद्यालयात जातात का, वर्गातील उपस्थिती कशी आहे, मित्र मैत्रिणींची संगत कशी आहे, ते व्यसनांपासून दूर आहेत का आणि चुकीच्या मार्गावर तर जात नाहीत ना, याकडे पालकांनी संवेदनशीलतेने लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांच्या आयुष्यावर पालकांनी जागता पहारा ठेवण्याची गरज असल्याचे  आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थित पालकांना  केले.       पालकांनी आपल्या मुलांना चंगळवादापासून दूर ठेवत शिक्षण, संस्कार, चारित्र्य, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीची मूल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन द्यावे. केवळ पदवी मिळविण्यापेक्षा चांगला आणि जबाबदार नागरिक घडणे अधिक महत्त्वाचे आहे असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

          खोलेश्वर महाविद्यालय हे केवळ अध्ययन - अध्यापनाचे केंद्र नसून संस्कार केंद्र आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था राष्ट्रभक्ती, सेवा, समर्पण, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये जपत गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. समाजाचा संस्थेवरील वाढता विश्वास ही अभिमानाची बाब असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. नवीन शैक्षणिक धोरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, वाढती स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर पालक - शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.दीपक फुलारी यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपप्राचार्य आनंद पाठक यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि कार्यक्रमाची माहिती पालकांना दिली. यावेळी प्रा.प्रसन्ना जोशी, प्रा.प्रल्हाद तावरे, प्रा.माणिक पोखरकर प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी यांनी महाविद्यालयाची बलस्थाने तसेच विविध उपक्रमांची माहिती उपस्थित पालकांना दिली. यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती पालक, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कालिदास चिटणीस यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक जिजाराम कावळे यांनी मानले. दोन सत्रांत संपन्न झालेल्या या पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार