पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक
अंबाजोगाई, दि. ६ : जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक (पीए) पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबाजोगाई येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी काजल देविदास भट्ट (रा. मारवाड गल्ली, नानज, ता. जामखेड) हिच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार संतोष शिंदे (वय २४, रा. अमृतेश्वरनगर, अंबाजोगाई) हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. आरोपी काजल भट्ट ही फिर्यादीच्या मामीच्या घरी भाड्याने राहत होती. तिने स्वतःला अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन केला होता.
काही दिवसांपूर्वी तिने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक पदाच्या तीन जागा रिक्त असल्याचे सांगत ओमकार शिंदे यांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी आपले निकटचे संबंध असल्याचा दावा करत तिने या पदासाठी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केली. चर्चेनंतर हा व्यवहार तीन लाख रुपयांवर निश्चित झाला.
यानंतर विविध वरिष्ठ अधिकारी व शासकीय कामांसाठी पैसे द्यावे लागतील, असे कारण देत आरोपी महिलेने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांकडून रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण चार लाख रुपये उकळले. विशेष म्हणजे, अप्पर जिल्हाधिकारी आणि बीड जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगूनही रक्कम घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, ३ जून रोजी आरोपीने व्हॉट्सॲपवर नियुक्ती आदेश पाठवला. मात्र त्या आदेशावर कोणताही अधिकृत शिक्का किंवा लोगो नव्हता. तसेच रुजू होण्याची तारीख रविवारची असल्याने फिर्यादीला संशय आला. चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आरोपी महिलेला जाब विचारला.
पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचे समजताच आरोपीने घाबरून एक लाख रुपये ऑनलाईन परत केले. मात्र उर्वरित रकमेबाबत विचारणा केल्यावर तिने उद्धटपणे वर्तन केले आणि त्यानंतर अचानक फरार झाली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४) व ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, शासकीय नोकरीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा