मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना
SIR-2026| विशेष पुनरीक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर कामांतून मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना
बीड | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 कार्यक्रमासाठी बीएलओ (Booth Level Officer) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना इतर प्रशासकीय व शालेय कामांमधून मुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.
शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, २४ जून ते २६ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओंना मतदार यादी पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी Enumeration Forms (EF) भरणे, माहिती संकलन, पडताळणी व अन्य निवडणूकविषयक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.या कालावधीत बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना कोणतेही अतिरिक्त प्रशिक्षण, बैठक, राष्ट्रीय योजना, सर्वेक्षण किंवा इतर प्रशासकीय कामे देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेतील आवश्यक शैक्षणिक कामकाजाचे नियोजन करून बीएलओंना निवडणूक कामासाठी आवश्यक वेळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेशात नमूद आहे.
तसेच, शाळांतील बीएलओ शिक्षकांकडे नॉन-टीचिंग स्वरूपाची अतिरिक्त कामे सोपवू नयेत. त्यांच्या नियमित शालेय कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेत निवडणूक आयोगाचे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या आदेशावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियाराणी पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा