२७२ किलो क्षमतेची लिफ्ट....
गैरसोय दूर ; सुविधा परिपूर्ण : परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयात अत्याधुनिक नवी लिफ्ट कार्यान्वित !
नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ
परळी वैजनाथ : प्रतिनिधी....
परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या लिफ्टमुळे मुख्यालयातील विविध मजल्यांवर ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषद मुख्यालयात बसविण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक लिफ्टचा औपचारिक शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.परळी नगरपरिषद मुख्यालयात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लिफ्टची सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लिफ्टमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मुख्यालयातील कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ व सोयीस्कर सुविधा मिळणार आहे.
२७२ किलो क्षमतेची लिफ्ट
-------------------
ही लिफ्ट २७२ किलो वजन क्षमतेची आहे. एकावेळी चार ते सहा जणांना प्रवास करता येईल, अशा क्षमतेची आहे. जी+३ (ग्राउंड फ्लोअर प्लस तीन मजले) स्वरूपाची ही लिफ्ट असून, ती ग्राउंड फ्लोअरपासून चौथ्या मजल्यापर्यंत ये-जा करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक तसेच विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा