सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती?
भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. एकमेकांशी भांडणाऱ्या पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज व सोपा आहे. भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत आहेत, त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल. यंदा २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे सण साजरे केले जाणार आहेत.
रक्षाबंधनच्या दिवशी अनेकांना पडणारा प्रश्न म्हणजे, राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती? सकाळ, दुपार की संध्याकाळ? आणि राखी बांधण्याची शुभ वेळ चुकली तर काय करावे? कोणत्या वेळेत राखी बांधावी? सर्व माहिती जाणून घ्या..
सकाळ, दुपार की संध्याकाळ? राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती?
रक्षाबंधनला राखी बांधण्यासाठी सकाळी ५:५७ ते सकाळी ९:४८ ही शुभ वेळ आहे. याशिवाय, तुम्ही अभिजीत मुहूर्तावर दुपारी १२:१४ ते दुपारी १:०५ या वेळेत भावाला राखी बांधू शकता.
काय सांगते धर्मशास्त्र?
शुक्रवारी पौर्णिमा तिथी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंतच आहे. त्यामुळे सकाळी ९.४९ च्या आतच राखी बांधावी लागेल का, अशी चर्चा सुरू होती. यावर स्पष्टीकरण देताना मोहन दाते यांनी सांगितले की, धर्मशास्त्र वचनानुसार सूर्योदयानंतर ६ घटीपेक्षा (म्हणजेच २ तास २४ मिनिटे) अधिक काळ पौर्णिमा असेल, तर त्या संपूर्ण दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. त्यामुळे ९.४९ पर्यंतच राखी बांधण्याचे कोणतेही बंधन नसून, बहिणींना संपूर्ण दिवसभरात कधीही भावाच्या हातावर प्रेमाचे रक्षासूत्र बांधता येईल.
राखी बांधताना म्हणावा ‘हा’ मंत्र
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।
तुम्हा सर्व भावंडांना रक्षाबंधनाच्या आजपासूनच खूप खूप शुभेच्छा! तुमच्यातील प्रेम कायम टिकून राहावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा