ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ दर्शनासोबत अन्नसेवेचा पवित्र संगम...
लोकोपयोगी उपक्रम : ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’मध्ये दररोज हजारो भाविकांना मोफत भोजनप्रसादाचा लाभ
परळी वैजनाथ/संतोष जुजगर
पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्यातून दररोज हजारो भाविक परळी वैजनाथ येथे दाखल होत आहेत. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना प्रेमाने आणि सन्मानाने भोजनप्रसाद मिळावा, या उदात्त भावनेतून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने सुरू केलेले ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’ हे भाविकांसाठी मोठा आधार ठरत असून, दररोज हजारो यात्रेकरू या मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत.
गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्र उपक्रमाला भाविकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून दररोज श्रीं च्या दर्शनासाठी दूरवरून येणार्या यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना सात्त्विक, स्वच्छ आणि पौष्टिक भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही सेवा अखंडपणे सुरू असल्याचे श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव श्री राजेश देशमुख यांनी सांगितले. अन्नछत्रामध्ये दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत भोजनप्रसादाचे वितरण केले जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी आधारकार्ड दाखवून भोजन कूपन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोजनामध्ये स्वच्छता, गुणवत्ता आणि सात्त्विकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या हजारो भाविकांना भोजनप्रसाद मिळत आहे.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सेवेमुळे परळीतील वैद्यनाथ मंदिराची भाविकसेवेची परंपरा अधिक समृद्ध होत आहे. भक्तांची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून सुरू असलेल्या ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’ चा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा