ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहाय्यातून 30 गुंठ्यांत सव्वातीन लाखांचे उत्पन्न!
लिंबू शेतीतून डिगंबर गडदे यांचा यशस्वी प्रयोग
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी डिगंबर जिजाराम गडदे यांनी अल्पभूधारक असूनही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत लिंबू शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ 1 एकर शेती असलेल्या गडदे यांनी 2019 साली 30 गुंठे जमिनीत 100 लिंबूची रोपे लावून शेतीत नवा प्रयोग सुरू केला. या लिंबू बागेला लागवडीपासून अवघ्या 27 महिन्यांत फळधारणा सुरू झाली. ग्लोबल विकास ट्रस्टचे सुयोग्य मार्गदर्शन आणि गडदे यांनी केलेल्या नियोजनामुळे चालू वर्षात त्यांनी सुमारे 9 क्विंटल लिंबू उत्पादन घेतले आहे. सध्या बाजारात लिंबाला 125 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, कधी कधी हा दर 10 रुपयांपर्यंत घसरतो. अशा चढ-उतारांमध्येही गडदे यांना सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला.
लिंबू लागवडीतूनआतापर्यंत त्यांनी सुमारे 3.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या शेतीसाठी त्यांचा एकूण खर्च केवळ 10 हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना लिंबूची रोपे आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. याबाबत बोलताना गडदे म्हणाले, “मयंक गांधी सरांच्या प्रेरणेतून आणि ग्लोबल विकास ट्रस्टच्या मदतीमुळे मला हे यश मिळाले. त्यांच्या सहकार्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” सध्या उर्वरित जमिनीतही लिंबू लागवड वाढवण्याचा त्यांचा मानस असून, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा