परळीत शानदार सोहळ्यात १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार ; संत -महंत, मान्यवर व समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती
सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान- नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
धर्म परायण व्यक्तिमत्व हे उपनयनासारख्या संस्कारांनीच रुजवले जाते - ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर
परळी वै.(प्रतिनिधी)-
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २२ एप्रिल रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला.शानदार सोहळ्यात मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. या मंगलमय व पवित्र सोहळ्यासाठी संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची मोठी उपस्थिती लाभली. धर्मपरायण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आपले सोळा संस्कार असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांनी केले. तर सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान असल्याची कृतज्ञ भावना परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
गेल्या ४६ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ८.५२ वा. दर्शन मंडप वैद्यनाथ मंदिर परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपुर्वक संपन्न झाला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या १९ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. यावेळी भागवत कथा प्रवक्तातथा प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह. भ. प. बाळू महाराज उखळीकर यांचे अशिर्वचन झाले . यावेळी उपनयन संस्कारांचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी माजलगाव येथील अनंतशास्त्री महाराज यांचीही उपस्थिती होती.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आदी उपस्थित होते.दोन दिवस हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी मातृकापुजन झाले. त्यानंतर उपनयन संस्काराचा मुख्य सोहळा पार पडला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहरदेव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले. सर्व बटूंची दर्शन मंडप ते प्रभू वैद्यनाथ मंदिर अशी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सनई चौघडा, मंत्रोच्चार व समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला होता.
सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने विशेष गौरव सोहळा...
या सोहळ्यात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परळीच्या नगराध्यक्षपदी लोकनिर्वाचित झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, देवीप्रसाद उर्फ राजाभय्या पांडे दीनदयाळ बँकेचे व्हाईस चेअरमन एडवोकेट राजेश्वर देशमुख,दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ. विवेक दंडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी यांचा सन्मान सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने या सोहळ्यात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण बहुउद्देशीय सभा परळीचे अध्यक्ष शरदराव कुलकर्णी हे होते. सूत्रसंचालन प्रा. रविंद्र जोशी , अजय जोशी यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान- नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी
दरम्यान, यावेळी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यानिमित्त सत्काराला उत्तर देताना परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या अविरत ४६ वर्षाच्या या उपनय संस्कार उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक एकता व धार्मिक संस्कार जतन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम उपयोगी ठरतात असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या सोहळ्यात नगराध्यक्षा म्हणून माझा सकल ब्राह्मण समाजाने केलेला हा सन्मान माझा व्यक्तिगत सन्मान नसून तो तमाम परळीकरांचा सन्मान असल्याची आपली भावना असल्याची कृतज्ञता यावेळी त्यांनी व्यक्त केली.
धर्म परायण व्यक्तिमत्व हे संस्कारांनीच रुजवले जाते -ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर
हिंदू धर्मात सोळा संस्कारांचे महत्त्व आहे.अध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. देव, देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात. या सोळा संस्कारांपैकी एक उपनयन संस्कार होय. त्यामुळे हे सोहळे आयोजित करणे अत्यंत गरजेचे असते. असे प्रतिपादन ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी यावेळी केले.
Click:- 1.........LIVE....उपनयन संस्कार सोहळा...
Live : 2....उपनयन संस्कार सोहळा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा