रंगतदार सामना व स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद

नव्वदच्या दशकातील परळीतील स्टार क्रिकेट खेळाडुंचे गेट टुगेदर

रंगतदार सामना व स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद 

परळी प्रतिनिधी.      90 च्या दशकातील परळी शहरातील स्टार क्रिकेट खेळाडूंचे गेट-टुगेदर नुकतेच संपन्न झाले. शहरातील या खेळाडूंनी परत एकदा नव्या उत्साहाने क्रिकेटच्या मैदानावर उतरून एक रंगतदार सामना खेळला व जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. क्रिकेट सामन्यानंतर क्रिकेट खेळाडू डिंपी भाटिया यांनी सर्व मित्रांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचाही सर्वांनी आस्वाद घेतला. 

   एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर तारुण्यात असताना अष्टपैलू कामगिरी करणारे परळी शहरातील 30 ते 40 खेळाडू   सुमारे 20 ते 25 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले. डिंपी भाटिया ,नगरसेवक व उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती होती असे निळकंठ चाटे तसेच क्रीडाशिक्षक अजय जोशी व प्रसिद्ध पत्रकार व लेखक तसेच क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले रानबा गायकवाड यांनी एकत्र येऊन शहरातील सर्व जुन्या क्रिकेट खेळाडूंना एकत्रित आणले. त्या सर्व क्रिकेट खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्व मित्रांना गेट-टुगेदर साठी निमंत्रण देण्यात आले. 

    7  जून रोजी या सर्व माजी क्रिकेटपटू असलेल्या मित्रांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या बाजीराव क्रिकेट मैदानावर एक 12  षटकांचा रंगतदार सामना खेळला. यामध्ये निळकंठ चाटे व साजिद शेख यांच्या संघात खेळाडूंची विभागणी करून बारा षटकांचा सामना झाला. अनेकांनी पन्नाशी पार केलेली असल्यामुळे मैदानावरही अनेक गमती जमती पाहायला मिळाल्या. तरी सर्वांनी उत्साहाने मैदानावर क्रिकेटचा आनंद लुटला. हा सामना साजिद यांच्या संघाने जिंकला परंतु जिंकल्याचा आनंद दोन्ही संघांनी तितक्याच उत्साहाने साजरा केला. जे खेळाडू मैदानात उतरले होते त्यापैकी अनेकांनी  विद्यापीठ संघात तसेच जिल्हा आणि विभागीय संघात  प्रतिनिधित्व केलेले होते.

    या खेळाडूमध्ये नगरसेवक निळकंठ चाटे, रानबा गायकवाड, अजय जोशी, साजिद शेख, सचिन सूर्यवंशी,बालाजी वाघ, अनिल जठार, नरसिंग देशमुख, महेंद्र ठाकूर, श्याम काकडे, मसरत शेख, वाजिद शेख, संजय देवधर, चंद्रकांत शिंदे, सचिन जोशी, संजय वानखेडे, सचिन ठाकूर, चंद्रकांत वाघमारे , पापा सिंग भाटिया, पापासिह ठाकूर, बबलू रोडगे, अनिल जाधव, विकी अवस्थी, गणेश केंद्रे, क्षणिक गीते, मकरंद नरवणे यांच्यासह 25 ते 30 खेळाडू सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंच्या पांढऱ्या टी-शर्टची व्यवस्था निळकंठ चाटे यांनी केली होती. क्रिकेट सामना संपल्यानंतर डिंपी भाटिया यांनी सर्व खेळाडूंसाठी संगम येथील त्यांच्या शेतातील फार्म हाऊसवर स्नेहभोजन दिले. या भोजनाचा सर्व खेळाडूंनी आस्वाद घेतला. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यसनापासून दूर राहावे आणि सामाजिक व राष्ट्रीय ऐक्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा असल्याचे या गेट-टुगेदर च्या माध्यमातून खेळाडूंनी नव्या पिढीच्या तरुणांना दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!