साहित्यिक दगडूदादा लोमटे यांची सदिच्छा भेट

 प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे काळाची गरज- ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे

परळीतील डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास  सदिच्छा भेट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-           

         आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे माहितीचे स्रोत वाढले असले, तरी वाचनातून मिळणारे ज्ञान, चिंतन आणि वैचारिक समृद्धी याला कोणताही पर्याय नाही,  समाजात ज्ञान, संस्कार आणि वैचारिक समृद्धी वाढविण्यासाठी प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू विचारवंत तथा अंबानगरीचे भूमिपुत्र दगडूदादा लोमटे यांनी परळीतील डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक दगडूदादा लोमटे यांची सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी व्यक्त केले. 

     परळी वैजनाथ शहरातील  डॉ.भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाकडे सध्या ४१,२८८ हजारांहून अधिक पुस्तकांची समृद्ध ग्रंथसंपदा असणाऱ्या नगर परिषदेच्या डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू विचारवंत तथा अंबानगरीचे भूमिपुत्र दगडूदादा लोमटे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी वाचनालयातील विविध सुविधा, ग्रंथसंपदा तसेच वाचनासाठी उपलब्ध वातावरणाची पाहणी करून त्यांनी वाचनालयाच्या कार्याचे कौतुक केले. वाचन संस्कृतीच्या जतन व संवर्धनाबाबत त्यांनी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवादही साधला.

        साहित्यसेवेचा एक भाग म्हणून दगडूदादा लोमटे यांनी वाचनालयास विविध विषयांवरील दर्जेदार व उपयुक्त पुस्तकांची भेट दिली. या पुस्तकांमुळे वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत भर पडणार असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, ज्येष्ठ नागरिक आणि साहित्यप्रेमी वाचकांना त्याचा लाभ होणार आहे.

         यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोबाईल आणि इंटरनेट हे आजच्या काळातील आवश्यक साधन असले तरी वाचनाची सवय कायम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तकांच्या सहवासातून विचारांना दिशा मिळते, व्यक्तिमत्त्व घडते आणि समाज अधिक सुसंस्कृत बनतो. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

        "मानवी जीवनात ग्रंथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ ग्रंथसंग्रह असून चालत नाही, तर श्रवण, आकलन आणि वाचन या त्रिसूत्रीची जोपासना होणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात वाचन ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. वाचन हा केवळ छंद नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे," असेही त्यांनी नमूद केले.

         परळी शहरात आजही विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, ज्येष्ठ नागरिक, साहित्यप्रेमी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने वाचनालयाचा लाभ घेत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ज्ञानार्जनाची ओढ आणि पुस्तकांविषयीचे प्रेम हीच परळीची खरी ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले.

     माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी म्हणाले की, "आजच्या स्पर्धेच्या युगात पुस्तकांशी नाते जोडणारी पिढी घडणे आवश्यक आहे. दगडूदादा लोमटे यांनी वाचनालयास दिलेली भेट आणि ग्रंथदान हे विद्यार्थी व वाचकांसाठी प्रेरणेचे स्रोत ठरणार आहे. ज्ञान, संस्कार आणि विचारांची परंपरा जपण्याचे कार्य ग्रंथालयांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे घडत आहे."

          ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासू विचारवंत तथा अंबानगरीचे भूमिपुत्र दगडूदादा लोमटे यांचे साहित्य, विचार आणि समाजप्रबोधनाचे कार्य अनेकांसाठी मार्गदर्शक राहिले आहे. त्यांच्या हस्ते डॉ. भालचंद्र वाचनालयाच्या ग्रंथसंपदेत झालेली भर ही परळीच्या वाचन चळवळीस बळ देणारी आहे. अशा अभ्यासू आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचा वाचनालयाशी असलेला संवाद विद्यार्थी व नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे शिक्षण सभापती योगेश मेनकुदळे यांनी सांगितले.

        यावेळी डॉ. भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी व शिक्षण सभापती योगेश मेनकुदळे यांच्या हस्ते दगडूदादा लोमटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षण सभापती योगेश मेनकुदळे, नगरसेवक अनंत इगळे, अब्दुल करीम, उमेश खाडे, सचिन स्वामी, गिरीष भोसले, शंकर साळवे, गंगाधर जगतकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!