बनावट सदस्य नोंदवही, बनावट ठराव, बनावट शपथपत्रे तयार केल्याचा आरोप....

शैक्षणिक संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल


बीड | प्रतिनिधी
           परळी-वैजनाथ येथील एका नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला असून, संस्थेवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
      पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील इस्लामपुरा येथील रहिवासी तथा मराठवाडा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल जफर अब्दुल सत्तार पटेल यांनी १४ जुलै रोजी ही फिर्याद दिली आहे. यानुसार, संबंधित संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून तिच्या माध्यमातून  प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविण्यात येते. २०२० ते २०२५ या कालावधीसाठी संस्थेच्या कार्यकारिणीला मान्यता मिळाली होती. संस्थेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन बदल अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आठ जणांनी संगनमत करून संस्थेच्या नोंदींमध्ये फेरफार केला. बनावट सदस्य नोंदवही, बनावट ठराव, बनावट शपथपत्रे आणि इतर कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयात बदल अहवाल दाखल केला. संबंधित बदल अहवालाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे हरकत घेण्यात आली होती. त्यानंतर  बदल अहवालाला आव्हान देण्यात आले. न्यायालयाने त्या प्रकरणात स्थगिती दिली. असे असतानाही पुन्हा कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, काही सदस्यांच्या नावाने त्यांच्या अनुपस्थितीत शपथपत्रे तयार करण्यात आली. संबंधित वकिलांनीही पोलिसांना दिलेल्या लेखी खुलाशात संबंधित व्यक्ती शपथपत्रासाठी त्यांच्या समोर हजर झाल्या नसल्याचे नमूद केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यामुळे फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती व त्यांचा वापर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
          या प्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी  महंमद सिराजोद्दीन महंमद गौस (रा. परळी वैजनाथ),पठाण सुलतान खान गाजीयोद्दीन (रा. सिरसाळा, ता. परळी) ,सय्यद आसेफ सय्यद अली (रा. परळी वैजनाथ),जियाऊर रहेमान मीनहाजोद्दीन मुलानी (रा. परळी वैजनाथ),शेख पाशा मोहम्मद साब (रा. परळी वैजनाथ),शेख जुबेर शेख शब्बीर (रा. परळी वैजनाथ),अब्दुल बशीर मुनिरोद्दीन (रा. परळी वैजनाथ),सय्यद सादतअली सय्यद रियासतअली (रा. परळी वैजनाथ) या आठ जणांविरुद्ध  गु. र. नं. 201/2026  भारतीय न्याय संहिता (कलम ३१६,कलम ३१८(४). ३३६(३) व ३३८,३४०(२)  कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार रामनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक  दीपक दत्तात्रय लंके हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...