ना. पंकजाताई मुंडे वाढदिवस>>>>प्रदीप कुलकर्णी यांचा विशेष अभिष्टचिंतन लेख
लोकनेत्याचा खरा वारसा !
✍️ प्रदीप कुलकर्णी
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने, आक्रमक नेतृत्वाने आणि जनमानसातील अढळ स्थानाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नेत्या म्हणजेच मा. पंकजाताई मुंडे... लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा राजकीय आणि सामाजिक वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेणाऱ्या पंकजाताईंनी केवळ 'वारसदार' म्हणून नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे.
लोकनेते मुंडे साहेबांच्या मुशीत घडलेल्या पंकजाताईंनी राजकारणाचे धडे घरातूनच गिरवले. मात्र, त्यांच्यातील नेतृत्वाची खरी चुणूक २००९ मध्ये महाराष्ट्राने पाहिली, जेव्हा त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत विधानसभेत पाऊल ठेवले. मुंडे साहेबांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली मोठी पोकळी आणि दुःख पचवत, त्यांनी केवळ स्वतःलाच सावरले नाही, तर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना आणि वंचित, उपेक्षित, कष्टकरी ऊसतोड कामगारांना धीर दिला.
२०१४ ते २०१९ या काळात राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी *जलयुक्त शिवार* योजनेसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचे ठरला. *मुख्यमंत्री ग्रामसडक योजने*च्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे मोठे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. *महिला बचत गटांना बळ* देणे आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी विशेष योजना राबवल्या.
राजकारणात चढ-उतार हे येतच असतात. काही काळाचा राजकीय संघर्ष आणि पराभवाचा सामना करावा लागला तरी पंकजाताई कधीही खचल्या नाहीत. "माझा जनतेवर आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे," हाच त्यांचा मूलमंत्र राहिला आहे. त्यांनी सातत्याने जनतेशी, विशेषतः मराठवाडा आणि महाराष्ट्रातील वंचित, ऊसतोड कामगार व बहुजन समाजाशी आपली नाळ कायम जोडलेली ठेवली.
त्यांच्या याच जनमानसातील प्रभावाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवली आणि मध्यप्रदेश राज्याचे सहप्रभारी केले, इथेही त्यांनी आपल्या संघटन कौशल्याचा ठसा उमटवला. बीड लोकसभेत निसटते अपयश आल्यानंतर पुढे त्यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी देत राज्यात कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. मंत्रिमंडळातील खातं कोणतंही असो, त्याला आपल्या अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध कामकाजातून एक वेगळी ओळख देण्याचं काम त्यांनी केलं. पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री म्हणून त्यांच्या जबाबदारीला आज जवळपास दीड ते दोन वर्षे होत आहेत. या कालावधीत अनेक चांगले निर्णय घेऊन त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे, पशूसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा, अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या, परळी व बारामती येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण भागातील तरूण उद्योजक व्हावेत यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण अशा कितीतरी नव नवीन योजनेतून त्यांची सामान्य जनतेप्रती असलेली तळमळ दिसून येते.
*वंचितांची माऊली*
-------
गोपीनाथराव मुंडे साहेबांनंतर ऊसतोड कामगारांचे प्रश्न हिरीरीने मांडणारे नेतृत्व म्हणून पंकजाताईंकडे पाहिले जाते. दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून त्या लाखो कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. हा दसरा मेळावा केवळ राजकीय नसून, तो ऊसतोड कामगार, वंचित आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचा आवाज बनला आहे. पंकजाताई मुंडे या केवळ एक राजकारणी नाहीत, तर त्या एक उत्तम वक्त्या, संघटक आणि संवेदनशील समाजसेविका आहेत. तरुणांशी संवाद साधताना त्या तितक्याच आधुनिक वाटतात, जितक्या ग्रामीण भागातील वृद्धांशी संवाद साधताना त्या घरच्या लेकीसारख्या वाटतात. सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.
थोडक्यात सांगायचे तर, पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व हे केवळ सत्तेभोवती फिरणारे नाही, तर ते संघर्षातून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व आहे. मुंडे साहेबांच्या वंचित, उपेक्षित घटकाच्या विकासाचा विचार पुढे नेणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ताईसाहेब येणाऱ्या काळातही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत राहतील यात शंका नाही, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हिच याप्रसंगी शुभकामना..!
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा