आष्टी आगाराच्या वाहक आलिशा बागवान यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक...
महिला वाहकाचा धाडसीपणा; पाठलाग करून सोनसाखळी चोरणारी महिला जेरबंद
वृद्ध प्रवाशी महिलेचे एक तोळ्याचे दागिने सुरक्षित परत
कडा : बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत वृद्ध प्रवासी महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरून पसार होणाऱ्या एका महिलेचा आष्टी आगाराच्या महिला वाहकाने धाडसी पाठलाग करून तिला रंगेहात पकडले. या प्रसंगामुळे वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाले. शनिवारी सायंकाळी कडा-मिरजगाव मार्गावरील बसमध्ये ही घटना घडली.
आलिशा बागवान या आष्टी आगारात महिला वाहक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी मिरजगावहून कड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका महिलेने वृद्ध प्रवासी महिलेच्या पिशवीवर लक्ष ठेवले. संधी साधून तिने पिशवी हिसकावली आणि बसमधून उतरून पळ काढला.
वृद्ध महिलेने आरडाओरड केल्यानंतर आलिशा बागवान यांनी क्षणाचाही विलंब न करता बसमधून उतरून चोरट्या महिलेचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी तिला पकडून तिच्याकडील पिशवी ताब्यात घेतली. पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये वृद्ध महिलेचे एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळले. त्यानंतर दागिने संबंधित महिलेकडे सुपूर्द करण्यात आले.
अचानक घडलेल्या घटनेनंतर दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिला भावुक झाल्या. त्यांनी आलिशा बागवान यांचे आभार मानत, 'तुम्ही माझ्यासाठी देवदूत ठरलात,' अशी भावना व्यक्त केली.महिला वाहकाने दाखविलेल्या धाडसाचे, तत्परतेचे आणि प्रसंगावधानाचे प्रवाशांसह विविध स्तरांतून कौतुक होत असून, सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी संकटसमयी दाखविलेल्या जबाबदारीचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा