हालचाल रजिस्टर, बायोमेट्रिक हजेरी चा मुद्दा उपस्थित.....
नगर परिषदेचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत इतरत्रच : अधिकाऱ्याच्या फोटोसेशनचा दाखला देत कारवाईची मागणी
स्थापत्य अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करा - सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध जोशी
परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी वैजनाथ नगर परिषदेत हालचाल रजिस्टर नाही. हजेरीची नोंद नाही.कार्यालयीन वेळेत कर्मचारी इतरत्रच असतात या मुद्द्यांना अधोरेखित करत एका अधिकाऱ्याच्या फोटोसेशनचा दाखला देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे रीतसर निवेदन देऊन स्थापत्य अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध जोशी यांनी केली आहे.
नगर परिषदेत दिलेल्या निवेदनानुसार, सोमवार (दि. २७ जुलै) रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेत संबंधित अधिकारी कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यात व्यस्त होते असा दावा करण्यात आला आहे.स्थापत्य अभियंता ज्ञानेश्वर उत्तरेश्वर ढवळे यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने नगर परिषदेतील बांधकाम विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतात. तसेच, कार्यालयाबाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले हालचाल (मूव्हमेंट) रजिस्टर उपलब्ध नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्याधिकारी संतोष रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, नगर परिषदेत हालचाल रजिस्टर उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. तसेच, संबंधित अभियंत्यांच्या अनुपस्थितीबाबत अधिकृत नोंद अथवा मंजूर रजा उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. परळी नगर परिषदेत बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली दीर्घकाळापासून कार्यरत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रभावी नियंत्रण राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नुसार संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित स्थापत्य अभियंता किंवा नगर परिषदेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेऊन चौकशी केली जाते का, याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा