परळीत मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा गीता परिवाराचा अनोखा उपक्रम उत्साहात
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
प. पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच संजय भैया मालपाणी आणि प्रमिला दीदी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने गीता परिवार, परळी वैजनाथ यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त नर्मदा बाबा हनुमान मंदिर येथे मुलांसाठी १०८ पार्थिव शिवलिंग पूजनाचा विशेष धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडला. परळी शहरात मुलांसाठी अशा प्रकारचे आयोजन प्रथमच करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
गीता परिवाराच्या वतीने मुलांसाठी पार्थिव शिवलिंग तयार करून देण्यात आले. कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना मुलांचे ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत स्वागत करून कपाळी टिळा लावण्यात आला. पूजेसाठी टोपी, वस्त्र, माळ तसेच आवश्यक पूजासाहित्य उपलब्ध करून देण्यात आले. काही मुलांकडे पूजेसाठी आवश्यक साहित्य कमी असल्यास त्यांनाही ते साहित्य देण्यात आले.महाराज प्रसाद कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चार व विधीवत मार्गदर्शनाखाली मुलांच्या हस्ते पार्थिव शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. गीता परिवाराच्या वतीने ललिता जाजू यांनी संकल्प सोडला. बालकांनी भक्तिभावाने पूजा करून आरतीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर मुलांच्या हस्ते बकेटमधून पाणी अर्पण करून पार्थिव शिवलिंगाचे विधीवत विसर्जन करण्यात आले. पूजेनंतर सर्व मुलांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सौ. सरोज अग्रवाल यांचा यावेळी अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला.
माती आणण्यापासून शिवलिंग निर्मिती, पूजन आणि विसर्जनापर्यंतच्या संपूर्ण आयोजनात गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.या उपक्रमासाठी सुनीता बंग, सुजाता मुंदडा, पूनम लाहोटी, अनुराधा सारडा, राधिका जाजू, ज्योती मुंदडा, सोनिया गटानी, कीर्ती झंवर, वंदना दरक, स्मिता बियाणी, प्रीती तापडिया, राजकन्या मंत्री भंडारी, शिक्षिका सरिता भंसाळी, प्रतिभा बजाज, कविता मुंदडा, भाग्यश्री पाटील आणि लक्ष्मी लिंबकर यांचे सहकार्य लाभले.यावेळी मुलांमध्ये संस्कार, भक्ती आणि भारतीय संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, यासाठी गीता परिवारातर्फे दर रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या साप्ताहिक वर्गात पालकांनी आपल्या मुलांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा