मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय...

 कमी पाण्यात ‘करटुले’चा प्रयोग; दीड एकरातून लाखोंच्या उत्पन्नाचा राजमार्ग 

धर्मापुरीतील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांची नावीन्यपूर्ण शेती; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय

धर्मापुरी प्रतिनिधी :

कमी पाणी, वाढता शेतीचा खर्च आणि बदलते हवामान यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, या परिस्थितीला संधी मानत धर्मापुरी येथील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांनी कमी पाण्यात करटुले पिकाची यशस्वी लागवड करून शेतीतील नावीन्याचा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात केलेल्या या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या प्रयोगाकडे वेधले गेले आहे.

फड यांनी गट क्रमांक २००३ मधील सुमारे दीड एकर क्षेत्रावर गावरान बियाण्यांपासून करटुलेची लागवड केली आहे. साधारण चार महिन्यांच्या या पिकाला लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी फळधारणा सुरू होते. त्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी तोडणी करता येते. एका हंगामात साधारण दहा तोडण्या होत असल्याने नियमित उत्पन्नाची शक्यता निर्माण होते.

ठिबकवर करटुले; पाण्याची बचत

करटुलेच्या लागवडीसाठी प्रति एकर सुमारे दीड किलो बियाणे लागते. बियाण्याची किंमत अंदाजे १० हजार रुपये प्रतिकिलो आहे. मे-जूनमध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लागवड केली जाते. प्रत्येक ठिबक पॉइंटवर दोन बिया टाकून सुमारे पाच फूट अंतरावर सऱ्या तयार केल्या जातात. वेलींच्या वाढीसाठी तारेचे मंडप अथवा जाळीची व्यवस्था केली जाते.

या पिकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा बियाणे टाकण्याची आवश्यकता भासत नाही. जमिनीत तयार झालेल्या गड्ड्यांमधून पावसाळ्यात पुन्हा कोंब फुटतात आणि नव्या वेली तयार होतात. त्यामुळे पुढील हंगामातील लागवड खर्च कमी करण्यास मदत होते.

२०० रुपये किलोपर्यंत बाजारभाव

सध्या करटुल्याला सुमारे २०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असून पुणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर यांसह स्थानिक बाजारपेठेतही मागणी असल्याचे फड यांनी सांगितले. प्रति एकर सुमारे ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. योग्य बाजारभाव आणि उत्पादन मिळाल्यास प्रति एकर सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत उत्पादनमूल्य मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

पारंपरिक शेतीला नावीन्याची जोड

कमी पाण्याची गरज, वारंवार होणारी तोडणी, बाजारपेठेतील मागणी आणि पुढील हंगामात लागवड खर्चात होणारी संभाव्य बचत या वैशिष्ट्यांमुळे करटुलेचे पीक शेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते. विशेषतः मराठवाड्यासारख्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या भागात ‘कमी पाण्यात अधिक उत्पन्न’ या संकल्पनेला अशा प्रयोगांमुळे बळ मिळत आहे.

कुंडलीक बाबुराव फड यांच्या करटुले शेतीची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांच्या शेताला भेट देत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही नवे पीक, नवी पद्धत आणि बाजारपेठेचा विचार करून शेती करण्याचा त्यांचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

पाणी कमी असले तरी कल्पकता, प्रयोगशीलता आणि योग्य नियोजन असेल तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते, हा संदेश धर्मापुरीतील फड यांच्या करटुले शेतीच्या प्रयोगातून अधोरेखित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!