_मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका
गंभीर दखल व कठोर भूमिका: परळीत टाकी बराच वेळ ओव्हरफ्लो होऊन पाण्याची नासाडी; संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई!
मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका ठेवत काढला निलंबन आदेश
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व न. प. पदाधिकारी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अतिशय गंभीर असल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच वान प्रकल्पातील अवैध पाणी उपशाच्यामुद्द्यावरून नगराध्यक्षांचे आक्रमक रूपही बघायला मिळाले होते.अशा परिस्थितीत पाण्याची बचत आणि काटेकोर नियोजन करण्याची गरज असताना मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवरून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला. अनेक नागरिकांनी याबाबत नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या.याची गंभीर दखल घेत याप्रकरणी कठोर भूमिका घेण्यात आली असून संबंधित एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवर नियुक्त असताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही टाकी निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ ओव्हरफ्लो होऊन त्यातील हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास बाब आणून देण्यात आली. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुभम रणधीर वाल्मिकी यांच्यावर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषद परळी वैजनाथचे मुख्याधिकारी यांनी १२ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश काढून ही कारवाई केली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना झालेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे.संबंधित कर्मचारी कामामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ७९ (१) सह अन्वये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ अन्वये पुढील चौकशी होईपर्यंत १२ सप्टेंबर २०२६ पासून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
याबाबतच्या अनेक तक्रारी नगराध्यक्षांसह पाणीपुरवठा सभापती , न. प. पदाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती सौ जयश्रीताई रविंद्र गित्ते यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा