जनुकीय बदलाची शक्यता...

आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाला पान्हा; दिंद्रुडमध्ये अजब घटना

जनुकीय बदलाची शक्यता, घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे अवघ्या आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव येत असल्याची अजब घटना समोर आली आहे. गेल्या सुमारे सात दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने कटारे कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. जनुकीय बदलामुळे अशी घटना घडण्याची शक्यता असून, यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दिंद्रुड येथील सुदाम कटारे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे सुमारे आठ शेळ्या आहेत. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या एका शेळीने तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी एका पिलामध्ये जन्मानंतर काही दिवसांनी असामान्य शारीरिक बदल दिसून आला.

या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव बाहेर येत असल्याचे कटारे यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटले. मात्र, वारंवार द्रव येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिली.

अवघ्या आठ दिवसांच्या पिलाला पान्हा फुटल्याचे समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. शेळीपालनाचा अनुभव असलेल्या नागरिकांनीही असा प्रकार क्वचितच पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे हे पिल पाहण्यासाठी ग्रामस्थांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सीधर तंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, जनुकीय बदलामुळे अशा प्रकारची घटना घडू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अशा घटना अत्यंत दुर्मीळ असून, सुमारे एक लाख शेळ्या-मेंढ्यांमध्ये एखाद्या प्राण्यात असा प्रकार आढळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

“जनुकीय बदलामुळे अशी घटना घडू शकते. यात घाबरण्याचे काही कारण नाही. योग्य उपचारानंतर संबंधित पिलाचे दूध येणे बंद होईल.”

डॉ. बन्सीधर तंबरे, पशुवैद्यकीय अधिकारी

दिंद्रुड परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून, नवजात पिलामध्ये आढळलेल्या या असामान्य शारीरिक बदलामुळे ग्रामस्थांचे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, अशा प्रकारांकडे केवळ कुतूहल म्हणून न पाहता पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!