परळीत श्रावण महोत्सव झाला पण परळीकरांना कळलच नाही.,..
‘श्रावण महोत्सव’ की सरकारी सोपस्कार?; कार्यक्रम झाला, रसिक मात्र गायब!
दर्जेदार कलावंत, उत्तम कार्यक्रम; पण प्रसिद्धीअभावी शासनाचा सांस्कृतिक उपक्रम जनतेपासूनच दूर
परळी वैजनाथ : प्रतिनिधी..
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ अपेक्षित रसिकांविना पार पडल्याने शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनासह प्रसिद्धी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार आणि गुणी कलावंतांचा सहभाग असतानाही कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात अपयश आल्याने दर्जेदार कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साधता आला नसल्याची चर्चा शहरात आहे.
‘श्रावण महोत्सवा’अंतर्गत ‘स्वरविहार’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राजेश सरकटे यांच्यासह विविध कलावंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र, कार्यक्रमाची व्यापक पूर्वप्रसिद्धी झाल्याचे जाणवले नाही. शहरातील अनेक नागरिक, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाच कार्यक्रमाची माहिती नसल्याची स्थिती होती.
कार्यक्रम उत्तम; मात्र प्रेक्षक कुठे?
-----------------
शासकीय पातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना कार्यक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हीदेखील नियोजनाची महत्त्वाची बाब आहे. स्थानिक माध्यमे, सामाजिक माध्यमे, प्रमुख चौक, मंदिर परिसर, शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनांच्या माध्यमातून प्रभावी प्रसिद्धी केली असती, तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती लाभली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कलावंतांनी कला सादर केली; जनतेपर्यंत निमंत्रण पोहोचले का?
------------------
कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याबद्दल सहभागी कलावंतांना दोष देणे योग्य ठरणार नाही. कलाकारांनी आपली कला सादर करण्याची भूमिका बजावली; मात्र ती ऐकण्यासाठी रसिकांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचविण्याची जबाबदारी आयोजक आणि संबंधित यंत्रणेची होती. आयोजन चांगले असतानाही प्रसिद्धी आणि जनसंपर्काचा अभाव राहिला, तर शासनाचा उद्देशच मर्यादित राहतो.
शासकीय कार्यक्रम ‘उरकायचा’ की जनतेपर्यंत पोहोचवायचा?
----------------
जनतेच्या करातून होणाऱ्या खर्चातून आयोजित होणारा सांस्कृतिक कार्यक्रम केवळ कागदोपत्री पूर्तता किंवा औपचारिकता म्हणून न पाहता त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. त्यासाठी आयोजन, स्थानिक प्रशासन, सांस्कृतिक विभाग आणि जनसंपर्क यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे. परळीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाची प्रसिद्धी किती करण्यात आली? स्थानिक माध्यमे आणि सांस्कृतिक संस्थांना माहिती देण्यात आली होती का? अपेक्षित आणि प्रत्यक्ष उपस्थिती किती होती? संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीला निश्चितच गरज आहे. मात्र, दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून सभागृहापर्यंत तो पोहोचविणे पुरेसे नाही; तो रसिकांच्या मनापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन आणि प्रभावी जनसंपर्कही तितकाच आवश्यक आहे. अन्यथा खर्च होईल, कलाकार येतील; पण खुर्च्या मात्र रसिकांची वाट पाहत राहतील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा