परळीचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच:धनंजय मुंडे देणार मुस्लिम समुदायाला संधी !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी आज दिनांक 15 रोजी होणार आहेत परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना रिपाई व मित्र पक्षाच्या महायुतीचे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद व स्वीकृत नगरसेवकांच्या चारही जागावर महायुतीच्याच उमेदवारांना संधी मिळणार हे निश्चित आहे. प्रमुखपद असलेल्या उपनगराध्यक्षपदी महायुतीकडून कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला राबवत धनंजय मुंडे हे ही मोठी जबाबदारी मुस्लिम समुदायाला देतील हे अपेक्षित आहे. परळीच्या उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान पठाण यांची वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक 15 रोजी परळी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. या विशेष सभेत परळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी होणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. परळी नगरपरिषद निवडणूक 2025 नंतर आता आज दिनांक 15 रोजी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची ही विशेष सभा पार पडणार असून उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर हे निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी एक वाजता विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची निवड होणार आहे. आवश्यकता असल्यास या पदांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. त्यानंतर अधिकृत उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या जातील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
दरम्यान, परळी नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिपाई व मित्रपक्ष महायुती ला भरभरून यश मिळालेले आहे. सभागृहात त्यांचे संपूर्ण बहुमत असून या अनुषंगाने उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य महायुतीच्या गटातूनच होणार हे निश्चित असले तरी महायुती मधून उपनगराध्यक्ष पदावर कोणाला संधी मिळते आणि चार नामनिर्देशित सदस्यांच्या जागांसाठी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्य पदाकरिता एकूण पाच अर्ज दाखल झाले होते त्याची छाननी आज उपविभागीय अधिकारी परळी यांनी केली. या छाननीनंतर हे पाचही अर्ज वैध झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. नामनिर्देशित सदस्य पदाकरिता सर्वश्री देशमुख दीपक रंगनाथराव, देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे, बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी, प्रणव प्रकाश मराठे, अजीज अब्दुल हबीब कच्छी यांच्या नामनिर्देशन पत्रांचा समावेश आहे.
विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या विशेष बैठकीत आ.धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्मुला परळी नगर परिषदेत राबवू शकतात. या अनुषंगाने उपनगराध्यक्ष पदाची मोठी संधी मुस्लिम समुदायातील नगरसेवकाला मिळू शकते. या अनुषंगाने चर्चेत राहिलेल्या गुत्तेदार राजा खान पठाण यांच्या पत्नी नगरसेविका खैसर राजा खान पठाण यांना उपनगराध्यक्षपदाचा बहुमान मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक पदी बाजीराव भैय्या प्रकाशराव धर्माधिकारी,देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे, प्रणव प्रकाश मराठे, अजीज अब्दुल हबीब कच्छी यांच्या निवडी निश्चित झाल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी दीपक रंगनाथ देशमुख यांचा अर्जही आहे. परंतु सभागृहात त्यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठीचा आवश्यक मतांचा कोटा सध्यातरी नसल्याने नेमकं ते कसे मते मिळवतील हेही तेवढेच उत्सुकतेचे राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा