१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ
१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे.
सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत महाराज सास्तूरकर, ह.भ.प. रामानंद महाराज आळंदीकर, ह.भ.प. गोविंदजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. शुभम महाराज देहूकर, ह.भ.प. ओमकार महाराज आळंदीकर तसेच ह.भ.प. प्रभाकर (नाना) महाराज झोलकर यांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
या सप्ताहात विशेष आकर्षण म्हणून १०८ वाचकांकडून सामूहिक हनुमान चालीसा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान चालीसा पठणामुळे मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, सकारात्मक विचारांची वाढ होते तसेच चांगले संस्कार घडण्यास मदत होते, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
सप्ताहाच्या कालावधीत पहाटे ४ वाजल्यापासून काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम पठण, हनुमान चालीसा पारायण, गाथा भजन, धुपारती व हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ, गावकरी मंडळ व श्री रोकडेश्वर संस्थानचे विश्वस्त परिश्रम घेत आहेत. दरम्यान गुरुवार, २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त सकाळी ५ ते ७ या वेळेत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा