तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीने त्याला विनाकारण शिवीगाळ करत अडवले. गाडीवरून उतरलेल्या एका आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने आशिषच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे आशिष रस्त्यावर कोसळला. घटना घडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यावेळी जखमी झालेल्या आशिषने मदतीसाठी धावून आलेल्या व्यक्तीला फोनचा पासवर्ड दिला आणि बेशुद्ध झाला. त्या व्यक्तीने आशिषच्या आईला कॉल करून त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या आशिषवर लातूर येथील रुग्णालयात उचार सुरु असून डोक्याला मार असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कागणे करत आहेत.
तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी तातडीने रात्रीतून पथक पाठवून शोध घेत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यात साहिल मांदळे, जीतू मांदळे आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. साहिल आणि जीतू मांदळेला शुक्रवारी अंबाजोगाई येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे फोफावली गुंडगिरी, नागरिकांचा आरोप
अंबाजोगाईतील ट्युशन एरियात आधीपासूनच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा वावर सध्या तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भागात गुंडांचे विविध टोळके सतत दहशत निर्माण करत असून विद्यार्थिनींच्या विनयभंगाचे प्रकार आणि मारामाऱ्या नित्याच्याच झाल्या आहेत. पोलिसांची गस्त नियमित होत नसल्याने या भागात गुंडगिरी कमालीची फोफावली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यपर्यंत या टवाळखोरांची मजल गेली आहे. या भागात बेफाम वेगाने गाड्या पळवून रहिवाशांना त्रास दिला जात आहे. उद्या जर एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पोलिसांनी असे गुंड तरुण शोधून तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
#CrimeNews #Ambajogai #StudentSafety #BeedPolice #MarathiNews

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा