पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन
राष्ट्रवादी (शप) शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सोपवले पत्र
परळी रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनाची खासदारांकडून दखल; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग (बाप्पा) मनोहर सोनवणे यांनी परळी वैजनाथ रेल्वे टर्मिनसच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन मार्फत पत्राद्वारे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
८ जून रोजी परळी वैजनाथ येथे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या 'एक दिवशीय धरणे आंदोलना'ची दखल घेत खासदारांनी हे पत्र लिहून रेल्वेमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. जीवनराव देशमुख,गटनेते नितीन बागवाले,नगरसेवक कादर कुरेशी, कार्याध्यक्ष बदर भाई, श्रीनिवास राऊत, संघटक सद्दाम शेख, बाबा शेख, अरुण सपाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर रेल्वे प्रवासी उपस्थित होते.
पत्रातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे;
मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेसचा परळीपर्यंत विस्तार : २०२० मध्ये शिफारस केलेली ट्रेन क्र. १२७४९/१२७५० मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेस परळी वैजनाथपर्यंत वाढवण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. हा विस्तार केल्यास हैदराबाद, विकाराबाद, बिदर, उदगीर, लातूर रोड आणि परळी वैजनाथ दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल, तसेच हैदराबाद विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. या विस्तारासाठी कोणत्याही इंजिन रिव्हर्सल किंवा ट्रेन नंबर बदलण्याची गरज भासणार नाही.
कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या : नाशिक येथे आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद, बिदर आणि कलबुरागी ते नाशिक रोड (परळी वैजनाथ मार्गे) अशा विशेष/अतिरिक्त रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात याव्यात.
परळी टर्मिनसवर पिट लाईनची निर्मिती : रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी (Maintenance) आणि भविष्यातील रेल्वे विस्तारासाठी परळी वैजनाथ टर्मिनस येथे पिट लाईन (PIT Line) सुविधा मंजूर करून ती त्वरित उभारण्यात यावी.खासदार बजरंग सोनवणे यांनी या मागण्या प्रवाशांच्या हिताच्या असून, रेल्वे मंत्रालयाने यावर सकारात्मक व तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती पत्रात केली आहे. या पत्राच्या प्रती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि दक्षिण मध्य रेल्वेचे (SCR) महाव्यवस्थापक यांनाही आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा