बीडच्या राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त रोहन बहीरवर बालभारतीत धडा!
बीड– पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला स्वत:च्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासारखे धाडस दाखवलेल्या बीडमधील रोहन रामचंद्र बहीर-पाटील या मुलावर बालभारतीच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे एक धडा घेण्यात आला आहे. खुद्द रोहनचे कुटुंबीयही या संदर्भात अनभिज्ञ होते. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात धडा घेतल्याची माहिती कालच (गुरुवारी, १८ जून) आम्हाला मिळाल्याचे रोहनचे वडील रामचंद्र बहीर यांनी सांगितले.
बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रहिवासी असलेल्या रोहन बहीर याने २६ सप्टेंबर २०२१ मध्ये छायाबाई गायकवाड या महिलेला डोंगरी नदीला आलेल्या पुरात वाहून जाण्यापासून वाचवले होते. त्यावेळी रोहन बहीर नवगण राजुरीतील गजानन विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता. रोहनच्या धाडसाचे त्यावेळी सर्वत्र कौतुक झाले, परंतु त्याच्या शौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डाॅ. संजय तांदळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.
रोहनला अगदीच कोवळ्या वयात म्हणजे पंधराव्या वर्षी दाखवलेल्या धाडसासाठी २०२३ साली पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या विज्ञान भवनात बालशौर्य पुरस्कार देऊन रोहनचा सन्मान करण्यात आला होता. रोहनच्या धाडसापासून इतर मुलांनीही प्रेरणा घ्यावी म्हणून त्याच्यावर एक धडाच बालभारतीने सहावीच्या पुस्तकात घेतला आहे. लेखक दिलीप फलटणकर यांनी रोहनवर किशोर मासिकात डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखावर बेतलेला हा ‘धाडसी रोहन’ शीर्षकाचा धडा आहे.
सव्वा एकर शेती....
रोहनचे वडील रामचंद्र बहीर यांना अवघी सव्वा एकर शेती आहे. वडील शेती करतात तर आई राधा या गावातच म्हणजे नवगण राजुरीमध्येच आरोग्यसेविका आहेत. राजवीरा ही सहा वर्षाची एक बहीण, असे त्याचे चौकोनी कुटुंब.
आनंद गगनात मावेना...
रोहनने २६ सप्टेंबर २०२१ रोजी येथील डोंगरी नदीला आलेल्या पुरातून छायाबाई गायकवाड यांना वाचवले. याचा अभिमान वाटत होताच. सर्वच स्तरातून त्याचे काैतुक झाले. परंतु राेहनवर बालभारतीच्या पुस्तकात धडा घेणे ही आमच्यासाठी व जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. कालच लेखक दिलीप फलटणकर यांचा फोन आला तेव्हाच धड्याविषयी माहिती मिळाली. तोपर्यंत अनभिज्ञच होतो. रोहन सध्या अकलूज येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.
-रामचंद्र बहीर, रोहणचे वडील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा